मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूसंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात ‘मंकीपॉक्स क्लेड १ बी’चा नवीन रुग्ण आढळला आहे. या प्रकारचा रुग्ण आढळणारा भारत हा आफ्रिके बाहेरील तिसरा देश ठरला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याबरोबरच रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> कामा रुग्णालयात महिलांसाठी विशेष मूत्ररोगशास्त्र विभाग

चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादीही उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट रोजी मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केली असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. २००५ च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे. राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारी करण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्य व जिल्हा स्तरावर आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ‘मंकीपॉक्स क्लेड १’चे लक्षणे ‘क्लेड २’सारखीच असली तरी, ‘क्लेड १’मध्ये धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.