मुंबई : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून (मळी) तयार होणाऱ्या इथेनॉलचे खरेदी दर प्रति लिटर ५६.५८ रुपयांवरून ५७.९७ रुपये केला आहे. उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत होणाऱ्या इथेनॉलचे दर जेसे – थे ठेवले आहेत. सी हेवी मोलॅसिसपासून फार इथेनॉल तयार होत नसल्यामुळे आणि फक्त १.३९ रुपये इतकी किरकोळ दरवाढ झाल्यामुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही, असे मत साखर उद्योगातून व्यक्त केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५, या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, सी हेवी मोलॅसेसपासून (सीएचएम) उत्पादीत इथेनॉलचा खरेदी दर ५६.५८ रुपये प्रति लिटरवरून ५७.९७ रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. हा निर्णय साखर कारखाने, शेतकरी आणि पर्यावरण हिताचा असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ या इथेनॉल पुरवठा वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण पातळी २० टक्क्यांवर नेण्याची घोषणी केली आहे. सध्या १८ टक्क्यांपर्यंत मिश्रण केले जात आहे.

केंद्र सरकारच्या निर्णया बद्दल साखर उद्योगातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारने इथेनॉल दरवाढीचे गाजर दाखवले आहे. देशातील साखर कारखान्यांतून चालू इथेनॉल वर्षांत ६५० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यात उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत इथेनॉलचा वाटा ९० टक्क्यांपर्यंत आहे. सी हेवी मोलॅसिसपासून होणारी इथेनॉल निर्मिती जेमतेन पाच ते सात टक्के इतकीच आहे. यंदा ६५० कोटी लिटरपैकी सी हेवी मोलॅसिसपासून जेमतेम ५० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे फक्त सी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर १.३९ रुपयांनी वाढवून साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही, असे मत वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

साखर उद्योगाच्या मागणी वाटाण्याच्या अक्षता

उसाचा दर, साखर किंवा साखरेचा पाकापासून उत्पादीत इथेनॉलचा खरेदी दर ६८.१३ रुपये प्रति लिटर आहे, तो ७३.१४ रुपये करावा. बी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत इथेनॉलला ६०.७३ रुपये दर होता, तो ६७.७० करावा आणि सी हेवी मोलॅसिसपासून उत्पादीत दर ५६.२८ रुपये होता, ६१.२० रुपये करावा, अशी मागणी होती. पण, सरकारने फक्त सी हेवी मोलॅसिसचा दर १.३९ रुपयाने वाढविला आहे. केंद्राच्या या निर्णयाचा साखर उद्योगावर काहीही फरक पडणार नाही. इथेनॉलचे दर आणि साखरेच्या किमान विक्री मूल्याची उसाच्या एफआरपीशी सांगड घालावी. एफआरपी वाढविताना इथेनॉल आणि साखरेचे दरही वाढवावेत, अशी मागणी होती. आमच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, अशी माहिती राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government raised purchase price of ethanol from c heavy molasses to rs 57 97 per liter from rs 56 58 mumbai print news sud 02