सीबीआयमध्ये सचोटी व प्रामाणिकपणा नसल्याने संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार वाचले, असा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी गुरुवारी येथे केला. ‘भारतापुढील आव्हाने’ विषयावर केसी महाविद्यालयात बोलताना जेटली म्हणाले, लोकसभेत जेव्हा मतदान असेल, त्यावेळी सीबीआयने आपली प्रतिज्ञापत्रांमधील भूमिका बदलली आणि समाजवादी व बहुजन समाजवादी पक्षाने संसदेतील आपल्या भूमिका बदलल्याचे दिसून आले आहे. सीबीआयवरील शासकीय नियंत्रण कमी होईल, अशा शिफारशी संसदीय चिकित्सा समितीने सुचविल्या आहेत. माओवाद्यांना कसे तोंड द्यायचे, याबाबत गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे. माओवाद्यांच्या प्रभावाखालील क्षेत्रात विकासाचा मार्ग आणि सुरक्षा बले यांचा योग्य समन्वय साधला गेला पाहिजे. देशाचा विकासदर ९ टक्क्य़ांवर जाण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.