वाहतुकीची समस्या ही तमाम चालक वर्गासाठी मोठा यक्षप्रश्न ठरते. विशेषत: देशातील मोठ्या शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतुकीची समस्या वाहनचालकांसाठी मोठा मनस्ताप ठरली आहे. या पार्श्वभूमीवर चांगले रस्ते बनवल्यास वाहतुकीच्या समस्येपासून सुटका होऊ शकेल, असं म्हटलं जातं. मात्र, कितीही रस्ते बांधले, तरी काही वर्षांनी पुन्हा वाहतुकीची समस्या निर्माण होते. यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’ या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येचं विश्लेषण करतानाच त्यावरचा रामबाण उपायदेखील सुचवला आहे.
“भारतात दोन प्रकारचे कौशल्य, एक…”
यावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या स्वभावानुसार केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. “भारतात दोन प्रकारचं कौशल्य आहे. एक लोकसंख्या वाढवण्याचं आणि दुसरं ऑटोमोबाईल विकासाचं”, असं गडकरी म्हणाले. मात्र, यापुढे बोलताना त्यांनी देशातील रस्ते वाहतुकीच्या समस्येवरचा तोडगा सांगताना पार्किंगच्या मुद्द्यालाही हात घातला.
“रस्ते का बनवायचे तर गाड्या आहे म्हणून. आपल्याकडे काय होतं, तर घरात असतात चार लोक पण गाड्या असतात आठ. दिल्लीत तर पार्किंग कुणी बनवतच नाही. जणूकाही आम्ही रस्ते बनवलेच यांच्या पार्किंगची व्यवस्था व्हावी म्हणून! सगळ्या गाड्या रस्त्यावर असतात. मोठमोठ्या घरात बघितलं तर सगळे गाड्या रस्त्यावर उभ्या करतात. कुठे ना कुठे ही समस्या आहे. ऑटोमोबाईल आणि लोकसंख्या सोबतच वाढत आहे”, असं गडकरी यावेळी म्हणाले.
“मी चांगले रस्ते बनवतो, पण माझी एक समस्या आहे”
“मी चांगले रस्ते बनवतो. पण माझी एक समस्या आहे. पहिलं प्राधान्य मास रॅपिड ट्रान्सपोर्टला आहे. खासगी गाड्यांऐवजी मास रॅपिड ट्रान्सपोर्टने लोक ऑफिसला गेले, तर साहजिकच रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी होईल. गाड्यांची संख्या कमी करायला हवी. सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा झाली, त्यात दर्जा असेल, तर साहजिक गाड्यांची संख्या कमी होईल. ते करण्याची गरज आहे”, असं गडकरी यावेळी म्हणाले.