Mumbai Local Alert Updates मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लाॅकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात येईल. तर,ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लाॅक असेल. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लाॅक सुरू असेल. शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लाॅक असेल. या कालावधीत मध्य रेल्वेवरील ९३० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत तर, ८९० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. तसेच ७४ रेल्वेगाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत:रद्द होणार आहेत. परिणामी, मध्य रेल्वेवरील सुमारे ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहे.
सीएसएमटी फलाट क्रमांक १०-११ वर सध्या १६ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबत असून या फलाटावर २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी फलाटाचा विस्तार केला जात आहे. मध्य रेल्वेकडून हे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सीएसएमटी येथील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. ब्लाॅक काळात मध्य रेल्वेवरील एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द होतील. शनिवारच्या दिवशी सुट्टीकालीन वेळापत्रक चालविण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. ठाणे येथील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
ब्लॉक १ – ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉक कालावधी – गुरुवारी मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारपर्यंत
ब्लॉक २ – सीएसएमटी येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक
ब्लॉकची कालावधी – शुक्रवार मध्यरात्रीच्या १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत
ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीमा मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.
हेही वाचा : दोन महिन्यांचे बाळ पुन्हा अविवाहितेच्या ताब्यात, बालकल्याण समितीची उच्च न्यायालयात माहिती
शुक्रवारी मध्य रेल्वेवरील १६१ लोकल फेऱ्या रद्द, शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द आणि ६१३ लोकल अंशत: रद्द, रविवारी २३५ लोकल फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याप्रमाणे शुक्रवारी ४ रेल्वेगाड्या रद्द आणि ११ रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील. शनिवारी ३७ रेल्वेगाड्या रद्द आणि ३१ रेल्वेगाड्या अंशत: रद्द, रविवारी ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील.
पश्चिम रेल्वेवरील रविवारचा ब्लाॅक न घेण्याचे कळविले आहे. त्यानुसार ते त्यांचा निर्णय घेतील. राज्याचे प्रधान सचिव यांना देखील ब्लाॅक संदर्भात माहिती दिली असून त्यांच्याद्वारे योग्य पावले उचलली जाणार आहेत. तसेच पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस विभागाला सीएसएमटी, भायखळा या परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती केली आहे. बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळ यांना देखील जादा बस सोडण्याबाबत कळवले आहे. बेस्ट उपक्रमाला सीएसएमटी, भायखळा, वडाळा भागात नियमित बस चालविण्यासह जादा २५ ते ३० बस चालवण्यात येण्याचे कळविले आहे. तसेच एसटी महामंडळाला पुणे, नाशिक, ठाणे, पनवेल येथे जादा बस सोडण्याचे कळविले आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले.
हेही वाचा : गोवंडी येथील झाडांभोवतीचे काँक्रीटीकरण हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवलत द्या
शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेने सीएसएमटी येथे आणि ठाणे येथे मेगाब्लाॅक घेतल्याने, लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय लोकलचा प्रवास करू नये. तसेच मुंबई महानगरातील सरकारी, खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर पर्यायाने काम करण्याची संधी द्यावी. त्यामुळे स्थानकातील प्रवाशांची गर्दी आणि असुविधा प्रवाशांना टाळता येईल.
स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
शनिवार-रविवारी सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लाॅक असू शकतो, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी अंतिम निर्णय अद्याप कळविला नाही. बुधवारी रात्रीपर्यंत त्यांच्याकडून ठोस माहिती मिळाली की, अतिरिक्त बस सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.