मेगाब्लॉक रद्द करून रविवारी प्रवाशांना दिलासा दिल्याच्या बढाया मारणाऱ्या मध्य रेल्वेने सोमवारी पुन्हा गोंधळाचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ असल्याचे दाखवून दिले. गेल्या वर्षांच्या अखेरपासूनच आपल्या प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचा चंग बांधलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाजवळ एकाच दिवशी दोन वेळा पेण्टाग्राफ तुटला. या अद्भुत घटनेनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरीय तसेच मेल एक्सप्रेस गाडय़ांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी गर्दीच्या वेळी उपनगरीय गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
उपनगरीय प्रवाशांना आरामदायक व वक्तशीर सेवा देण्याचे मध्य रेल्वेचे धोरण कधीच बोंबलले असून आता केवळ विना अपघात प्रवासाची अपेक्षा प्रवासी करत आहेत. असे असताना सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ सकाळी साडेअकरा वाजता मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीचा पेण्टाग्राफ तुटला. ही गाडी केवळ एका पेण्टाग्राफच्या सहाय्याने कल्याणपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गाडीतील मालाची क्षमता जास्त असल्याने कळवा खाडीपर्यंत गाडी पोहोचल्यानंतर ती पुन्हा ठाणे स्थानकात सात क्रमांकाच्या फलाटावर आणण्यात आली. अखेर दुपारी दीड वाजता ही समस्या सोडवून गाडी पुढे रवाना करण्यात आली. मात्र त्यामुळे मुंबईकडे व कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक कोलमडली. तर नेत्रावती, कामायनी व पवन या एक्सप्रेस गाडय़ा ठाणे रेल्वे स्थानकाजवळ रखडल्या होत्या.
या समस्येतून डोके वर काढेपर्यंत दुपारी ३.१०च्या सुमारास आणखी एका लोकल गाडीचा पेण्टाग्राफ तुटल्याची घटना ठाणे स्थानकाजवळच घडली. त्यामुळे पुन्हा एकदा लोकलसेवा कोलमडली. ही लोकल पूर्ववत वाहतुकीत आणण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न झाल्यानंतर अखेर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही लोकल बाजूला करण्यात आली व वाहतूक पूर्ववत झाली. मात्र या दीड तासाच्या गोंधळामुळे पुढील सर्व गाडय़ा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना दर दिवशीप्रमाणे सोमवारीही मध्य रेल्वेचा दणका मिळाला.
आधीच उल्हास, त्यात ‘पेंटाग्राफ’चा त्रास
मेगाब्लॉक रद्द करून रविवारी प्रवाशांना दिलासा दिल्याच्या बढाया मारणाऱ्या मध्य रेल्वेने सोमवारी पुन्हा गोंधळाचे ‘पहिले पाढे पंचावन्न’ असल्याचे दाखवून दिले. गेल्या वर्षांच्या अखेरपासूनच आपल्या प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्याचा चंग बांधलेल्या मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाजवळ एकाच दिवशी दोन वेळा पेण्टाग्राफ तुटला.
First published on: 08-01-2013 at 04:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway affected by pantagraff broken