मुंबई: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी निरनिराळ्या कारणांमुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली होती. तर दाट धुक्याने बुधवारी पहाटे मध्य रेल्वेची वाट अडवली. तसेच बुधवारी सकाळी डोंबिवली – कोपरदरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वेचा लेटलतीफ कारभार नित्याचा झाला आहे. घरून लवकर निघाल्यानंतरही लोकल वेळेवर धावत नसल्याने नोकरदारांना कार्यालयात वेळेवर पोहचता येत नाही. बुधवारी पहाटेपासून लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यातच डोंबिवली – कोपर दरम्यान लोकलमधून एक प्रवासी पडला असता आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा… मुंबईतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांच्या रंगभूमी करात वाढ; राज्य सरकारच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी

घटनास्थळी रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस पोहचले आणि त्यांनी प्रवाशाचा मृतदेह रेल्वे मार्गावरून हलविला. त्यामुळे काही लोकल कूर्मगतीने मार्गस्थ होऊ लागल्या. दरम्यान, भुसावळ विभागात दाट धुक्याची चादर पसरल्याने येथून मुंबई विभागात येणाऱ्या रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या. रेल्वेगाड्या उशिराने धावू लागल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दररोजचा खोळंबा

हिवाळ्यात धुक्यामुळे, पावसाळ्यात पाणी साचल्याने, तर उन्हाळ्यात रेल्वे रुळाला तडे जात असल्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे कारण मध्य रेल्वेकडून पुढे करण्यात येते. त्याचबरोबर प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढल्यामुळे मध्य रेल्वे उशिराने धावत असल्याचे कारणे नित्याचेच झाले आहे. कारणे देण्यापेक्षा लोकल वेळेत चालवण्यासाठी, वक्तशीरपणा वाढविण्यासाठी कामे करावी, असे एका प्रवाशाने सांगितले.

प्रत्येक अप-डाऊन लोकल उशिराच चालविल्या जातात. मध्य रेल्वे नियंत्रण विभागाने याबाबी गांभीर्याने घ्याव्यात आणि योग्य ते नियोजन करावे. अन्यथा संघटनेतर्फे सांविधानिक मार्गाने मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

डोंबिवली – कोपर दरम्यान लोकलमधून एक प्रवासी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway again disrupted due to various reason mumbai print news dvr