मध्य रेल्वेवर सध्या गाडय़ा रुळांवरून घसरणे, ओव्हरहेड वायर तुटणे वा त्यात बिघाड होणे, या प्रकारांमुळे प्रवाशांचे मेगाहाल सुरू आहेत. आतापर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे हे बिघाड होत असल्याचे सांगणाऱ्या मध्य रेल्वेने गेल्या दोन आठवडय़ांमधील बिघाडांसाठी वादळी वाऱ्यांना कारणीभूत ठरवले आहे. मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायरला धोकादायक ठरणारे हे वादळी वारे समुद्राच्या जवळ असलेल्या पश्चिम रेल्वेला मात्र अजिबातच त्रासदायक ठरलेले नाहीत! त्यामुळे आपल्या त्रुटी लपवण्यासाठी अधिकारी वादळी वाऱ्यांचा आडोसा घेत असल्याची टीका कामगार संघटनाच करत आहेत.
सप्टेंबरअखेरीस परतीच्या पावसादरम्यान मुंबईत वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ६५-७० किलोमीटर एवढा होता. याचा तडाखा मुंबईतील वाहतुकीलाही बसला. मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायरच्या बिघाडालाही हे वारेच कारणीभूत असल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला. ओव्हरहेड वायरसाठी ताशी ६० कि.मी.पेक्षा वेगवान वारे धोकादायक असतात त्यामुळेच ओव्हरहेड वायर बिघडण्याचे प्रमाण वाढल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
हार्बर रखडली
नेरुळ आणि जुईनगर या दोन स्थानकांदरम्यान अप मार्गावर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता ओव्हरहेड वायरवर पत्रा पडल्याने वायरमध्ये बिघाड झाला. ऐन गर्दीच्या वेळी या बिघाडामुळे गाडय़ा एकामागोमाग एक थांबल्या.  अप मार्गावरील गाडय़ा दिरंगाईने धावत असल्याने त्याचा परिणाम डाऊन मार्गावरील वाहतुकीवरही झाला. अखेर संध्याकाळी ६.५० वाजता हा बिघाड दुरुस्त होऊन वाहतूक सुरू झाली.

Story img Loader