Central Railway Tells Why Escalator Don’t Work: पूर्वी केवळ फॅन्सी मॉल मध्ये दिसणारे एस्केल्टेअर आता मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर सुरु झाले आहेत. गर्दीत उभे राहून थकलेल्या प्रवाशांसाठी ही अत्यंत सोयीची सुविधा आहे. परंतु अनेकदा मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील एस्केलेटर हे बंदच असल्याचे आढळून येतात. जेव्हा असे बंद व धूळ खात पडलेले एस्केलेटर दिसतात तेव्हा आपणही “काय या रेल्वेवाल्यांना कळत नाही का” असा विचार केलाच असेल हो ना? पण आता यात आमचा दोष नाही उलट प्रवाशांच्या काही चुकांमुळेच इलेक्ट्रिक जिने बंद पडत असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
मुद्दाम एस्केलेटर बंद करून…
मध्य रेल्वेच्या दाव्यानुसार, लांब पल्ल्याच्या ट्रेन येण्यापूर्वी कुली एस्केलेटर बंद करतात कारण त्याचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. कुलींनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर दुसरे कारण म्हणजे, अनेक आगाऊ प्रवासी गंमत म्हणून विनाकारण लाल ‘STOP’ बटण दाबतात. तर ज्येष्ठ नागरिक ज्यांना चालत्या जिन्यावर पाऊल टाकणे कठीण वाटते ते देखील स्टॉप बटण वापरतात, असे अधिकारी सांगतात. यामुळेच मुंबई आणि आजूबाजूच्या विविध रेल्वे स्थानकांवर एस्केलेटरच्या बिघाडाचे प्रकार वाढत आहेत.
‘या’ स्थानकांवर एस्केल्टर बिघाड अधिक
मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील ७९ स्थानकांवर १११ एस्केलेटर बसवले आहेत. मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्यांना दररोज सुमारे १५०-२०० वेळा हे एस्केलेटर पुन्हा सुरू करावे लागतात. कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि कल्याणसारख्या स्थानकांवर, जिथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात तिथे हा प्रकार अधिकवेळा घडत असल्याचे समजत आहे. तर ठाणे, वाशी, वडाळा, कुर्ला, घाटकोपर आणि त्यापुढील काही स्थानकांवर लोकल प्रवासी थट्टा म्हणून इमर्जन्सीसाठी असलेले लाल बटण दाबतात. लोकांनी एस्केलेटरच्या हँडरेल्सचे नुकसान केल्यामुळे आणि चप्पल, चाव्या आणि कापडाचे तुकडे यांसारख्या गोष्टी मशीनमध्ये फेकल्यामुळे देखील बिघाड होऊ शकतो.
हे ही वाचा<< मुंबई: आजपासून १२ डब्यांच्या फास्ट लोकलमध्ये मोठा बदल; आधीच वाचा, नाहीतर होईल धावपळ…
एस्केलेटर बंद झाल्यास सुरु कसे होते?
एकदा एस्केलेटर बंद झाल्यावर रीसेट करण्यासाठी किमान १० -१५ मिनिटे लागतात. मुळात याची तक्रार किंवा माहिती मिळण्यात वेळ लागतो आणि मग त्यानंतर स्टेशनचे प्रभारी अधिकारी सीसीटीव्हीची पुनर्तपासणी करतात आणि बंद एस्केलेटरची तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वे कर्मचारी पाठवतात.
हे ही वाचा<< मुंबई लोकलच्या स्टेशनची नावे कशी ठरली? घाटकोपर, कुर्ल्यासह ‘या’ ५ स्थानकांची कहाणी जाणून व्हाल थक्क
मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल सांगतात की, “आम्ही एका इन-हाउस तंत्रज्ञानावर काम करत आहोत ज्यामुळे एस्केलेटर खराब होण्याचे प्रमाण कमी होईल.”