मध्य रेल्वेच्या १६० वर्षांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा येत्या शनिवारी रात्री मध्य रेल्वे ओलांडणार आहे. आतापर्यंत डीसी विद्युतप्रवाहावर (डायरेक्ट करंट) चालणारी मध्य रेल्वे या रविवारी पहिल्यांदाच सीएसटी ते कल्याण यादरम्यान एसी विद्युतप्रवाहावर (अल्टरनेट करंट) धावणार आहे. मात्र प्रवाशांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता येणार नाही. शनिवारच्या रात्री मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शेवटची गाडी १०.५० वाजता रवाना होणार आहे. त्यानंतर मध्यरात्री काही गाडय़ा रवाना होणार असल्या, तरी प्रवाशांनी त्या गाडय़ांसाठी गर्दी करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
या रात्री मध्य रेल्वेवरील चारही मार्गिका, कळवा कारशेड, कुर्ला कारशेड, दादर टर्मिनस आणि सर्व यार्ड या सर्व ठिकाणी या विद्युत प्रवाहाची चाचणी होणार आहे. या चाचणीसाठी शनिवार २० डिसेंबर रोजी रात्री १०.४५ वाजल्यापासून रविवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी ६.१५पर्यंत सीएसटी ते कल्याण यादरम्यान एकही गाडी धावणार नाही. मुंबईहून कल्याणला जाणारी शेवटची धीमी गाडी सीएसटीहून रात्री १०.४३ वाजता सुटेल. तर कसाऱ्यासाठी शेवटची अर्धजलद गाडी १०.५० वाजता आणि कर्जतसाठीची जलद गाडी ११.१८ वाजता सुटेल. कल्याणहून मुंबईला येणारी शेवटची धीमी गाडी ९.४० वाजता कल्याणहून निघेल. कर्जतहून शेवटची गाडी ९.१५ आणि कसाऱ्याहून शेवटची गाडी ९.२१ वाजता निघेल. तर प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे-खोपोली-कसारा यादरम्यान मध्यरात्री गाडय़ा चालवण्यात येतील.
रेल्वेतर्फे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महापालिकांना जादा बसेस सोडण्याची विनंतीही करण्यात आली आहे. तसेच या चाचणीमुळे रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
ही चाचणी यशस्वी झाल्यास आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या चाचण्यांमधून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यासच मध्य रेल्वेवर नव्या गाडय़ा धावणे शक्य होणार आहे.

Story img Loader