मुंबई : ऊन-पावसाचा खेळ, वाढलेली आद्रता आणि त्यामुळे वाढत्या उकाड्याने त्रासलेल्या मुंबईकरांची पाऊले वातानुकूलित लोकलकडे वळत आहेत. मात्र, वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या सोमवारी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे तिकिटाचे पैसे वाया आणि वर मनस्ताप प्रवाशांच्या पदरी आला.

मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करून वातानुकूलित लोकल सुरू केल्या. मात्र, प्रवासी आणि महसूल मिळत नसल्याने वातानुकूलित लोकलचा देखभालीचा खर्च अधिक होऊ लागला होता. त्यामुळे मध्य रेल्वेसाठी वातानुकूलित लोकल चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. परंतु, सध्याच्या घडीला प्रवाशांचा प्रतिसाद असतानाही तांत्रिक बिघाडामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोकलच्या तिकिटापेक्षा पाचपट रक्कम अधिक मोजूनही प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरत आहे.

हेही वाचा >>> जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया

वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी असूनही प्रवासी त्यांच्या कामाच्या वेळा सांभाळून, वातानुकूलित लोकलच्या वेळेत प्रवास करतात. मात्र, मध्य रेल्वेकडून थेट वातानुकूलित लोकल रद्द करून त्या वेळेत सामान्य लोकल चालवली जाते. त्यामुळे वातानुकूलित पासधारकांचे पैसे वाया जात आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे ज्या दिवशी वातानुकूलित लोकल धावत नाही, त्यादिवसाचे पैसे परत करण्याची मागणी पासधारक प्रवाशांनी केली.

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. १३ सप्टेंबर रोजी ११ वातानुकूलित लोकल फेऱ्या, १४ सप्टेंबर रोजी ९ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तर, १६ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवरील मुंब्रा-दिवा दरम्यान दादर-बदलापूर वातानुकूलित लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. तसेच तांत्रिक बिघाडाने २१ सप्टेंबर रोजी १० आणि २३ सप्टेंबर रोजी १० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

हेही वाचा >>> अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक

मध्य रेल्वेवर दैनंदिन १,८१० लोकल फेऱ्या धावत असून त्यातील ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्या आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलचे ६ रेक आहेत. यापैकी ५ रेकच्या लोकल फेऱ्या धावत आहेत. तर, एक रेकची दीर्घकालीन देखभाल-दुरूस्ती करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत.