मुंबई : मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या अप आणि डाऊन दोन नवीन रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी, उपनगरीय यार्ड रिमॉडेलिंगसाठी मध्य रेल्वेने शनिवारी व रविवारी पनवेल येथे मोठा ब्लॉक घेतला आहे. तसेच पनवेल येथे लोकलसाठी उप रेल्वे मार्गिकेवर (ईएमयू स्टेबलिंग साईडिंग) गुरुवार ते रविवारपर्यंत मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या पाच दिवसीय ब्लॉकमुळे हार्बर मार्गिकेवरील लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> खिचडी गैरव्यवहार प्रकरणः संदीप राऊत यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत बेलापूर – पनवेल लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची सीएसएमटी लोकल रात्री ११.१४ वाजता सुटेल आणि रात्री १२.३४ वाजता पनवेलला पोहचेल. डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री ११.३२ वाजता सुटेल आणि पनवेलला रात्री १२.२४ वाजता पोहचेल. अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.
हेही वाचा >>> एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार
अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल रात्री १०.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री ११.०७ वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी येथून पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल वेळापत्रकानुसार असेल. ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर पहिली लोकल सकाळी ६.२० वाजता ठाण्याहून सुटेल आणि सकाळी ७.१२ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल पहाटे ५.१७ वाजता सुटेल आणि सकाळी ६.३६ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्सहार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल पहाटे ५.४४ वाजता पनवेलहून सुटेल आणि सकाळी ६.३८ वाजता ठाण्याला पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.