मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी गर्दीच्या वेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना मनस्ताप सोसावा लागला. या बिघाडामुळे मध्य रेल्वेवर जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. नऊ सेवा रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीला तोंड देत आपापली कार्यालये गाठावी लागली.
सकाळी ९.१० च्या सुमारास कल्याणजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडामुळे वाहतूक काही काळ बंद पडली. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल ३५ मिनिटांचा कालावधी लागला. बिघाड दुरुस्त होऊन सर्व सेवा पूर्ववत होण्यासाठी एक तास गेल्याने या दरम्यान वाहतुकीची वाताहत झाली होती. अखेर ९.४५ च्या दरम्यान हळूहळू वाहतूक सुरू करण्यात रेल्वेच्या तंत्रज्ञांना यश आले. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती.

Story img Loader