लोकल, रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विशेष तिकीट मोहीम राबवून विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी करून यंदाच्या आर्थिक वर्षात १०० कोटींची दंडवसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षात २६ फेब्रुवारीपर्यंत १०० कोटींचा टप्पा ओलांडला होता. यंदा १३ फेब्रुवारीला, १३ दिवस आधीच १०० कोटींचा पल्ला ओलांडला आहे.
हेही वाचा >>> मुंबई: अटल सेतूलावरुन महिन्याभरात धावली ८ लाख १३ हजार वाहने,महिन्याभरात केवळ १३ कोटींचा महसूल
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन केले जाते. सध्या ‘रेल्वेचे तिकीट काढून, सन्मानाने प्रवास करा’ असे घोषवाक्य तयार करून प्रवाशांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यासह विशेष तिकीट मोहीम राबवून, दरदिवशी हजारोंच्या संख्येने विनातिकीट प्रवाशांना पकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात येत आहे. नियमित तिकीट तपासणी, तेजस्विनी पथक व इतर तिकीट तपासणी करून वर्षभरात १२.७४ लाखांहून अधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले. यात १०० कोटींहून अधिकचा दंड वसूल केला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मध्य आणि कोकण रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांची धरपकड
जानेवारी २०२४ मध्ये कोकण रेल्वेवरील विनातिकीट नसलेल्या आणि अनियमित तिकीट असलेल्या ९,५४८ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २,१७,९७,१०२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, मध्य रेल्वेने मंगळवारी पाच रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करून ८५ विनातिकीट प्रवाशांना पकडून ३३,३४० रुपयांची दंडवसुली केली. गाडी क्रमांक १७४११ सीएसएमटी ते कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१११ सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१०५ सीएसएमटी ते गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१०९ सीएसएमटी ते मनमाड पंचवटी एक्स्प्रेस या पाच रेल्वेगाड्यांमध्ये ३२ तिकीट तपासणीस, ६ आरपीएफ जवानाचे पथक तैनात करण्यात आले होते.