मुंबई : मध्य रेल्वेवरील तिकीटधारक प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी विनातिकीट प्रवाशांवर कारवाईचा बडगा मध्य रेल्वे प्रशासनाने उगारला आहे. त्यासाठी लोकल, एक्स्प्रेसमध्ये विशेष मोहीम आखून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक विनातिकीट प्रवासी असल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्षात ४६ लाख ३२ हजार विनातिकीट प्रकरणांतून ३०० कोटींची दंडवसुली केली आहे.
हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय व्यापारात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा!, जी -२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटातील सूर
मध्य रेल्वे मार्गावर हजारोंच्या संख्येने प्रवासी हे विनातिकीट प्रवास करतात. त्यांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमधील लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्ये, फलाटावर तिकीट तपासनिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. भरारी पथकाद्वारे विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईतून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४६.३२ लाख विनातिकीट प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करून ३०० कोटींहून अधिक दंड गोळा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने २१४.४१ कोटी दंड वसूल केला होता.
हेही वाचा >>> राहुल गांधींवरील कारवाईचे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांचे वक्तव्य
आर्थिक वर्षात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १९ लाख ५७ हजार विनातिकीट प्रकरणांमधून १०८.२५ कोटी रुपये, पुणे विभागाने ३.३६ लाख प्रकरणांमधून २४.२७ कोटी रुपये, नागपूर विभागाने ६.१६ लाख प्रकरणांमधून ३९.७० कोटी रुपये, भुसावळ विभागाने ९.०६ लाख प्रकरणांमधून ७०.०२ कोटी रुपये, सोलापूर विभागाने ५.२७ लाख प्रकरणांमधून ३३.३६ कोटी रुपये, प्रमुख मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पीसीसीएम) पथकाने २.९१ लाख प्रकरणांमधून २४.६५ कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. मध्य रेल्वेच्या २० तिकीट तपासनीसांनी वैयक्तिकरीत्या एक कोटींहून अधिक रुपयांची दंडवसुली केली आहे. यामध्ये पहिल्या तीन तपासनीसांमध्ये मुख्यालयातील तिकीट तपासनीस डी. कुमार आहेत. त्यांनी २२,८४७ प्रकरणांतून २,११,०७,८६५ रुपये, मुख्यालयातील तिकीट तपासनीस एस.बी. गलांडे यांनी २२,३८४ प्रकरणांतून १,९७,८७,४७० रुपये, मुंबई विभागातील तिकीट तपासनीस सुनील नैनानी यांनी १८,१६५ प्रकरणांतून १,५९,९८,१९० रुपयांची दंडवसुली केली आहे.