मुंबई : उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल-एक्स्प्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली. बुधवार, २७ नोव्हेंबरपासून फलाट क्रमांक १० ऐवजी फलाट क्रमांक ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ ऐवजी फलाट क्रमांक १० म्हणून ओळखला जाईल.
हेही वाचा : वैमानिक तरूणीची मुंबईत आत्महत्या, पवई पोलिसांनी केली मित्राला अटक
मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन विभागांना दादर स्थानक जोडले गेले आहे. दररोज या स्थानकातून सुमारे ५ लाख नागरिक प्रवास करत असतात. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी हे एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज ८०० लोकल आणि मेल-एक्स्प्रेस धावतात. मात्र दादर स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ कमी करण्याच्या उद्देशाने फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले. याआधीही डिसेंबर २०२३ मध्ये पश्चिम रेल्वेच्या फलाटांचे क्रमांक न बदलता, मध्य रेल्वेवरील १ ते ८ फलाटांचे क्रमांक अनुक्रमे ८ ते १४ असे करण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांकावरून दररोज शेकडो प्रवाशांचा गोंधळ उडत होता. त्यामुळे अनेकांना लोकलसह लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे फलाट शोधून त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत वेळ वाया जात होता. त्यामुळे या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी फलाटांचे क्रमांक बदलण्यात आले होते.