अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये बुधवारी पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानकातच वायर तुटल्याने तत्काळ वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्याने केवळ एकच गाडी रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र सकाळी उशिरापर्यंत उपनगरी वाहतूक तब्बल २० मिनिटे विलंबाने सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.  
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीनवर पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे कर्जतहून येणारी गाडी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकादरम्यान रखडली. या गाडीच्या पाठीमागे असलेल्या सर्व गाडय़ा अंबरनाथच्या फलाट क्रमांक दोनवरून वळविण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अंबरनाथपर्यंत जाणाऱ्या गाडय़ा बदलापूपर्यंत नेण्यात आल्या होत्या. सकाळी ७.३० वाजता ओव्हरहेड वायर पूर्ववत झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक २० ते २५ मिनिटे विलंबाने सुरू होती.

Story img Loader