लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. त्यामुळे पर्यटक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने इतर रेल्वेगाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. तसेच कसारा, कर्जतवरून सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रकही विस्कळीत झाले होते.
आणखी वाचा-दादर प्लाझा परिसरात पालिकेची स्वच्छता मोहीम, कचरा करणारे भाजीवालेही मोहिमेत सहभागी
नववर्षानिमित्ताने मुंबईत फिरायला आलेल्या आणि दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोमवारी मध्य रेल्वेच्या लेटलतीफ कारभाराला सामोरे जावे लागले. सकाळपासून लोकल सेवा विलंबाने धावत होत्या. त्यातच ब्रेक बायडिंग झाल्याने पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा २० मिनिटे खोळंबा झाला. एकाच वेळी दोन डब्यांना ब्रेक बायडिंग झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी अधिक कालावधी लागला. त्याचा इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. विलंबाने धावत असलेल्या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा फटका लोकललाही बसला. दुपारच्या सुमारास लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती.