ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून आसनगावकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती. या काळात हार्बर आणि मेन लाइनच्या सुमारे ६० गाडय़ा रद्द करण्यात आल्या. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने घरी जाण्याच्या घाईत असलेल्या हजारो चाकरमान्यांची मोठी रखडपट्टी झाली.
सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ७ वरून धीम्या मार्गाकडे जाणाऱ्या आसनगाव लोकलचा पेंटोग्राफ क्रॉसिंगवरील ओव्हरहेड वायरमध्ये अडकून वायर तुटली. परिणामी जलदपासून धीम्या मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली. ओव्हरहेड वायर जोडण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मसजिद बंदर या स्थानकादरम्यानचा विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला. यामुळे हार्बर आणि मेन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद झाली.
छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या सर्व गाडय़ांच्या रांगा थेट ठाण्यापर्यंत लागल्या. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील सर्व फलाट प्रवाशांनी तुडुंब भरले. कुल्र्यापर्यंतच्या सर्व फलाटांवरही तोबा गर्दी झाली होती. ओव्हरहेड वायर तुटल्याचे आणि विद्युतप्रवाह खंडीत करण्यात आल्याचे जाहीर होताच प्रवाशांचा लोंढा चर्चगेट, मरिन लाइन्स या पश्चिम रेल्वेच्या स्थानकांकडे वळला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीही वाढली. आझाद मैदान येथे अंगणवाडी सेविकांचा तसेच एसटी कामगारांचा मोर्चा आल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर मोर्चेकऱ्यांनी फुलून गेला होता. ठाणे आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविकांचे तसेच एसटी कामगारांचे यामुळे खूप हाल झाले. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी दिल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने चर्चगेट आणि मरीन लाइन्सकडे गेले.
मात्र तेथेही अतोनात गर्दी झाली होती. बेस्टने छत्रपती शिवाजी टर्मिनस ते दादरदरम्यान जादा बसेस सोडल्या. मात्र वाहतूक कोंडीमुळे या प्रवासालाही नेहमीपेक्षा जादा काळ लागत होता.
अनेक गाडय़ा रद्द
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीम्या मार्गावरील वाहतूक ६.४५ वाजता सुरू झाली. तर रात्री ७.५५ वाजता जलद मार्गावरील गाडी सोडण्यात आली. या काळात मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील सुमारे ४० ते ४५ गाडय़ा तर हार्बर मार्गावरील सुमारे २० गाडय़ा रद्द करण्यात आल्या.