दिवसभर कोसळलेल्या पावसाने मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन उपनगरी सेवेचा बोऱ्या वाजला. कल्याण, ठाणे, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ट्रॅकवर पाणी साचले नसतानाही लोकल जवळपास तासभर उशिराने धावत होत्या. या बिघाडामुळे दिवसभरात तब्बल २१ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
पावसाने दिवसभर संततधार धरल्याने अनेकांनी सुट्टीच्या दिवशी सहपरिवार नातेवाईक-मित्रांकडे जाण्याचे बेत रद्द केल्याने तिकीट खिडक्यांवर तुरळक गर्दी होती.
अनेक हौशी मुंबईकरांनी पावसाचा आनंद लुटण्यासाठी मित्र-मैत्रिणींसह, कुटुंबासह समुद्रकिनारी जाण्यासाठी  रेल्वे स्थानकांकडे मोर्चा वळवला. मात्र, रेल्वेची सिग्नल यंत्रणा संततधार पावसात अपयशी ठरली व त्याचा फटका प्रवाशांना बसला.
मध्य रेल्वेच्या लोकलगाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे जवळपास एक तास उशिराने गाडय़ा धावत होत्या. मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांची वेळ इंडिकेटरवर शून्य झळकत होती. अनेक गाडय़ा रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आठ विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत मध्य रेल्वेचे गाडे रूळावर आले नव्हते.