मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतीमान व्हावा आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन चुनाभट्टी – टिळकनगरदरम्यान कुर्ला उन्नत हार्बर मार्ग उभारत आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाचा अंतिम कालावधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आला आहे, असे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मिळविण्यासाठी केलेल्या अर्जात मध्य रेल्वेकडे कुर्ला उन्नत मार्गाबाबत विचारणा केली होती.
हेही वाचा…बँकॉकवरून आणलेला सव्वाचार कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त, दोन प्रवाशांना अटक
u
कुर्ला उन्नत मार्गाचे काम कंत्राटदार मेसर्स वालेचा आरई इन्फ्रा (जेव्ही) यांना दिले आहे. सद्यस्थितीत प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ आहे. एकूण करार मूल्य ८९.२६ कोटी रुपये असून आतापर्यंत ६२.६५ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता रोहित मेहता यांनी गलगली यांना दिली. दरम्यान, प्रकल्पास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला विलंबासाठी कोणताही दंड केलेला नाही. परंतु, त्याला ७० टक्के रक्कम देण्यात आली आहे, असे गलगली यांनी सांगितले.
अनिल गलगली यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या पत्रात प्रकल्पातील दिरंगाई आणि कंत्राटदारावर दंड न केल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवासीभिमुख कामांना उशीर होत असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळेवर प्रकल्प पूर्ण न झाल्यास खर्च वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने योग्य प्रकारे प्रकल्पाची देखरेख करणे आणि दिरंगाईस जबाबदार असणाऱ्यांविरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या कामांची गती वाढवून तो वेळेत पूर्ण केल्यास प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल, असे गलगली यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा…कुर्ला बस दुर्घटना प्रकरण : आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी निर्णय
कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ७, ८ मार्गावरून सीएसएमटी – वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकांदरम्यान लोकल चालविल्या जातात. तर, फलाट १ ते ६ वरून सीएसएमटी – कसारा, खोपोली दिशेकडे लोकल चालविण्यात येतात. मात्र मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्यामुळे लोकल फेऱ्यावर आणि गतीवर मर्यादा येते. त्यामुळे कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ७, ८ जवळ उन्नत मार्ग बनविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचा कसाईवाडा ते सांताक्रूझ-चेबूर लिंक रोड म्हणजे एलटीटी येथे शेवट असणार आहे. या मार्गाची लांबी १.१ किमी आहे. कसाईवाडा येथे तीन फलाट उभारण्यात येणार आहेत. पादचारी पूल, स्कॉयवॉक बनविण्यात येणार आहे. यासह येथे दुकाने, खाद्यपदार्थाची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकही उन्नत करण्यात येणार आहे.