मध्य रेल्वेवर गेल्या रविवारी हार्बर मार्गावरील एका गाडीचा डबा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ रुळावरून घसरण्याच्या प्रकरणाची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात गेल्या तीन वर्षांत चार वेळा गाडय़ा रुळावरून घसरल्या आहेत. या परिसरात गाडय़ांचा वेग अत्यंत कमी असूनही गाडय़ा का घसरतात, याचे नेमके कारण शोधण्यासाठी आता मध्य रेल्वेने चार अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती सर्व अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार असून त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसचा परिसर रेल्वेच्या परिभाषेत यार्ड परिसर म्हणून ओळखला जातो. या यार्ड परिसरात गाडी ८ ते १५ किलोमीटर प्रतितास एवढय़ा कमी वेगाने चालवण्याचे बंधन असते. एवढय़ा कमी वेगात गाडी असेल, तर गाडी रुळांवरून घसरण्याची शक्यता खूपच कमी असते. गेल्या आठवडय़ात दोन घटना घडल्या आहेत. गेल्या आठवडय़ात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून वाडीबंदर यार्डमध्ये जाणाऱ्या पंजाब मेलचा डबा रुळावरून घसरला होता. तर रविवारी हार्बर मार्गावरून छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शिरणाऱ्या गाडीचा एक डबा रुळावरून घसरला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद व विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी एकाच आठवडय़ात घडलेल्या या घटनांची गंभीर दखल घेत चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. या समितीमध्ये वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी स्वप्निल वाळींजकर, वरिष्ठ विभागीय अभियंता (दक्षिण) यादव, वरिष्ठ विभागीय सिग्नल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन्स अभियंता जनार्दन सिंग व वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता प्रफुल्ल वाघ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी या चारही घटनांची सखोल चौकशी करणार आहेत.

Story img Loader