घाटकोपर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्या मध्ये पडल्याने हात गमावलेल्या तरुणीच्या अपघाताच्या निमित्ताने प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेमार्गावरील ७४ स्थानकांपैकी फक्त सातच स्थानकांवर रुग्णवाहिका तैनात आहेत. या सातपैकी दोन स्थानकांवर रेल्वेतर्फे रुग्णवाहिका सेवा देण्यात येत असून उर्वरित पाच स्थानकांवर सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिका आहेत. दरम्यान, त्या तरुणीला वैद्यकीय मदत मिळण्यास दोन तासांपेक्षा जास्त कालावधी लागल्याची माहिती चुकीची असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
मध्य रेल्वेवर अपघातांमध्ये दरवर्षी अडीच हजारांपेक्षा जास्त मृत्यू होतात आणि एवढय़ाच लोकांना गंभीर दुखापतही होते. २०१३ मध्ये जुलै महिन्यापर्यंत मध्य रेल्वेवरील मृतांचा आकडा ९१२ होता. यापैकी बहुतांश अपघात रूळ ओलांडताना किंवा गाडीतून पडून होतात. या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका तैनात असणे आवश्यक आहे. रेल्वे अपघात झाल्यानंतरचा पहिला तास हा ‘सुवर्ण तास’ म्हणून ओळखला जातो. या तासाभरात रुग्णावर योग्य वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र अनेकदा हा सुवर्ण तास गाठणे शक्य होत नाही.
सध्या मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मेन या दोन्ही मार्गावरील एकूण ७४ रेल्वे स्थानकांपैकी फक्त ७ स्थानकांवरच रुग्णवाहिका तैनात आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांना विचारले असता, त्यांनी रुग्णवाहिकांची गरज असल्याची कबुली दिली. यासाठी रेल्वेने जाहीर निविदा काढली होती. सेवाभावी संस्थांच्या रुग्णवाहिकांना रेल्वेच्या परिसरात मोफत पार्किंग उपलब्ध करून देण्याबाबत ही निविदा होती. या रुग्णवाहिकांना बाहेरील रुग्णांना सेवा देण्यासही परवानगी होती. तसेच रेल्वे अपघातांमधील रुग्णांना सेवा देण्यासाठी रेल्वे त्यांना पैसे देऊ करणार होती. मात्र या निविदेला अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वच स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे रेल्वेच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यातही रुग्णवाहिका हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारितील ‘आरोग्य’ या विषयात समाविष्ट आहे. इतर वेळी रेल्वेच्या कामाचे श्रेय घेण्यास पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधिंनी आमच्या निविदेला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रत्येक स्थानकासाठी एक रुग्णवाहिका तैनात करणे शक्य होते. मात्र कोणीही तसे केले नाही, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा