Central Railway : भारतीय रेल्वेमधून दररोज जवळपास लाखो लोक प्रवास करतात. त्यामध्ये अनेजकण स्लीपर अथवा जनरल क्लासमधून प्रवास करतात. आता मुंबईत तर लोकल ही लाईफलाईन असल्याचं म्हटलं जातं. मात्र, ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. यासंदर्भातील अनेक भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. अनेकवेळा ट्रेनमध्ये जागेवरून भांडणं होतात. तसेच अनेकदा काहीजण तिकीट न काढताही प्रवास करताना आढळून येतात.
यानंतर अशा प्रकारच्या तक्रारी रेल्वे प्रशासनापर्यंत जातात. अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे आता मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला काही अडचण असेल किंवा त्याची काही तक्रार असेल तर थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार आहे, म्हणजे मध्य रेल्वेने आता व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.
हेही वाचा : ‘एमएमआर’च्या विकासाची जबाबदारी नोकरशहांकडे! राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राची सूचना अमलात
या व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवेमुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासी एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील, याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
Suburban passengers travelling in AC EMU/ First class coaches can now WhatsApp on mobile number 7208819987 for complaints related to unauthorised travel.
— Sr DCM, Mumbai, CR (@srdcmmumbaicr) September 9, 2024
"We appeal to all passengers to travel on a valid ticket"@Central_Railway @drmmumbaicr@YatriRailways
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांनी सोमवारी संध्याकाळी हेल्पलाइन नंबर ७२०८८१९९८७ शेअर केला आहे. एसी/फर्स्ट क्लास डब्यांमध्ये प्रवास करणारे प्रवासी आता या मोबाइल नंबरवर अनधिकृत प्रवासासंबंधीच्या तक्रारींसाठी व्हॉट्सॲप करू शकतात, असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच आम्ही सर्व रेल्वे प्रवाशांना वैध तिकिटांवर प्रवास करण्याचे आवाहन करतो, असंही म्हटलं आहे.
तसेच या एक्स (ट्विटर) वरील पोस्टनंतर एका एक्स (ट्विटर) वापरकर्त्याने त्या पोस्टला प्रतिसाद देताना म्हटलं आहे की, “मी हे दुपारच्या डोंबिवली एसी लोकलमध्ये करेन, त्यानंतर तुमचे कर्मचारी कोणी तिकीट तपासण्यासाठी येते का ते पाहतो.” तसेच दुसऱ्या एका वापरकर्त्याने रेल्वे अधिकाऱ्यांना हा उपक्रम एक्सप्रेस गाड्यांपर्यंत वाढवण्याची विनंती केली, जिथे अनधिकृत प्रवासाच्या अनेक समस्या नोंदल्या गेल्या असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “व्हॉट्सॲप हेल्पलाइन ही सेवा तिकीट नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.”