राज्यातील दुष्काळी भागामध्ये रेल्वे वाघिणींद्वारा पाणी पोहोचवू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्यावर आता मध्य रेल्वेनेही असे पाणी पोहोचविण्याची तयारी दाखविली आहे. मात्र याच्या तयारीसाठी केवळ एक महिना आवश्यक असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत असले तरी असे पाणी पुरविण्याची योजना राबवायची किंवा नाही हे यंदाच्या पावसाळ्यावर अवलंबून असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून पाण्याअभावी लोकांचे हाल होत आहेत. मराठवाडा, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आदी भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असून तेथे टँकरने पाणी पुरविणे कठीण होत आहे. रेल्वेच्या वाघिणींद्वारे या दुष्काळी भागामध्ये पाणी पुरविण्यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. राज्य शासनातर्फे मध्य रेल्वे प्रशासनाबरोबर चर्चा झाली असून यंदाचा पावसाळा किती लांबणार यावर असे पाणी पुरविण्याचा मुद्दा अवलंबून आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनीही अशी चर्चा झाल्याचे मान्य केले. मात्र रेल्वेच्या वाघिणींमध्ये पाणी भरणे आणि ते दुष्काळी भागामध्ये उतरवून घेणे याची तयारी राज्य शासनाला करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे वाघिणींमधून पाणी वाहून नेण्यासाठी प्रथम रेल्वेच्या वाघिणी स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. रेल्वेच्या एका वाघिणीमध्ये सुमारे अडीच हजार लिटर पाणी राहते. अशा ४० वाघिणींची एक गाडी २०० किमी अंतरावरील ठिकाणी पाणी पोहोचवू शकेल. या वाघिणी पेट्रोलजन्य पदार्थांच्या वाहतुकीमध्ये वापरण्यात येत असून त्या ‘स्टीम क्लिनिंग’ करणे आवश्यक आहेत. कुर्ला, दौंड, वडोदरा आणि कोचाली येथे या वाघिणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. यापूर्वीही सोलापूर, बीड भागातील जनतेला अशा पद्धतीने पाणी पुरविण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधून किंवा जेथे पाणी पुरेसे आहे तेथून रेल्वे मार्गापर्यंत टँकरने किंवा अन्य मार्गाने पाणी आणून ते वाघिणींमध्ये भरावे लागेल. दुष्काळी भागामध्ये पाण्याने भरलेल्या वाघिणींची गाडी आली की ती प्रत्येक स्थानकावर एक-एक वाघीण सोडत पुढे जाईल. शेवटच्या स्थानकावर जाऊन पुन्हा रिकाम्या वाघिणी गोळा करत गाडी पुन्हा पहिल्या स्थानकावर येईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. या वाघिणींमध्ये पाणी तलाव अथवा धरणातून भरण्यासाठी पुरेशा संख्येने टँकर आवश्यक असून दुष्काळी भागामध्येही टँकर आवश्यक आहेत, असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.
मराठवाडा हा दक्षिण-मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येत असल्याने केवळ मध्य रेल्वेशी चर्चा करून चालणार नाही, असे रेल्वे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा