Mumbai Local : वांद्रे स्थानकात अंत्योदय एक्स्प्रेस पकडताना झालेल्या चेंगराचेंगरीत आज नऊ जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या निमित्ताने लांब पल्ल्यांच्या गाड्या आता तुडुंब भरून वाहत असून अनारक्षित एक्स्प्रेसनाही प्रचंड गर्दी आहे. परिणामी ही गर्दी आणि गर्दीमुळे होणारी संभाव्य परिस्थिती टाळण्याकरता मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात आज एक्स पोस्ट करून प्रवाशांना माहिती दिली.

आज सकाळी पाच वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त विशेष गाडीला उशीर झाला. त्यामुळे ती गाडी रद्द करण्यात आली. त्यापाठोपाठ वांद्रे ते गोरखपूर धावणारी अंत्योदय एक्स्प्रेस सुटणार होती. ही अनारक्षित रेल्वे असल्याने यासाठी बुकिंग किंवा रिझर्व्हेशन लागत नाही. त्यामुळे विशेष ट्रेनला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अंत्योदय एक्स्प्रेसला झाली. परिणामी वांद्रे स्थानकात गर्दी वाढली. ट्रेन फलाटावर येण्याआधीच प्रवाशांनी ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. या धडपडीत अनेकजण फलाटावर पडले. यामुळे चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा >> Indian Railways: रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून वसूल केला जाईल दंड, जाणून घ्या नियम

मध्य रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांतून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात. तिथेही अशीच स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पश्चिम मार्गावरील घटनेचा धडा घेत मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूर या रेल्वे स्थानकांवर आता प्लॅटफॉर्म तिकिट मिळणार नाही. ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री वरील स्थानकांवर न करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. फक्त ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या आजारी प्रवाशांना यातून सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा >> Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!

प्लॅटफॉर्म तिकिट म्हणजे काय?

कुठेही न जाता फक्त फलाटावर कोणाची तरी वाट पाहणे किंवा कोणाला सोडायला जायचे असेल तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट काढावी लागते. प्लॅटफॉर्म तिकिट १० रुपये आहे. या तिकिटावर तुम्ही फलाटावर २ तास थांबू शकता. त्याव्यतिरिक्त थांबलात तर तुम्हाला २५० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.