मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी मध्यरात्रीपासून घेतलेल्या जम्बो ब्लॉकमुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. मात्र मुंबईतील रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर फारसा परिणाम जाणवलेला नाही. शुक्रवारी सकाळच्या पाळीला असलेले बहुतांश चतुर्थश्रेणी कर्मचारी कामावर हजर झाले. मात्र कार्यालयीन कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती लक्षणीय होती. तसेच रुग्णांच्या संख्येतही किंचित घट झाल्याचे निदर्शनास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेने शुक्रवारी घेतलेल्या जम्बो ब्लॉकमुळे गाड्या विलंबाने धावत असल्या तरी मुंबईतील सरकारी व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील सकाळच्या पाळीतील चतुर्थश्रेणी कर्मचारी व परिचारिका नियोजित वेळेवर कामावर हजर झाल्या. मात्र कर्जत, कसारा परिसरातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास अडचणी आल्या. तरी कल्याण पुढे राहणारे अनेक कर्मचारी सकाळी गाड्या सुरू असल्याने कार्यालयात पोहोचले. मात्र तुलनेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी होते. सर्व रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचारी व परिचारिका यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच आहे. त्यामुळे रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. तसेच जम्बो ब्लॉक लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या आवारातील कर्मचारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचारी मोठ्या संख्येने अनुपस्थित राहिले असते तर या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असते, असेही राज्य सरकार व महानगरपालिका रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, काही रुग्णालयांमध्ये कार्यालयीन कर्मचारी अनुपस्थित होते.

हेही वाचा…जम्बो ब्लॉक :मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याबाबत अद्याप निर्णय नाही

रुग्णांच्या संख्येत किंचित घट

मे महिन्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तुलनेत थोडे कमी असते. मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाल्याचे निदर्शनास आले. मात्र रुग्ण सेवा सुरळीत होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway jumbo block patient care is smooth due to presence of hospital staff mumbai print news psg
Show comments