मुंबई : मध्य रेल्वेवरील सामान्य लोकल आणि वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत आहे. त्यामुळे प्रवासी वारंवार स्थानक व्यवस्थापक किंवा समाज माध्यमावर तक्रारी करीत असतात. मात्र, विनातिकीट प्रवाशांना त्वरित रोखणे कठीण होते. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी ‘एसी लोकल टास्क फोर्स’ने प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमाकांवर तक्रार व्हाॅट्स ॲप केल्यास एक ते दोन दिवसांत तक्रारींचा पाठपुरावा करून निपटारा केला जात आहे. मध्य रेल्वेद्वारे १०० टक्के तक्रारींचे निवारण केले आहे.
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांना चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातच लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने २५ मे रोजी वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी ‘एसी टास्क फोर्स’ सुरू केला. प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध केला.
प्रवाशांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक अविरत काम करते. व्हाॅट्स ॲप क्रमांकाद्वारे तिकीटधारक प्रवासी विनातिकीट प्रवाशांच्या तक्रारी करीत आहेत. तसेच विशेष पथक गर्दीच्या वेळी तात्काळ मदत करीत असून आवश्यकतेनुसार पाठपुरावा करीत आहे. व्हॉट्स ॲप क्रमांकावर प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीला त्वरित प्रतिसाद देण्यात येत आहे.
विशेष पथक तक्रारीत केलेल्या विशिष्ठ विभागात असेल तर ते ताबडतोब कारवाई करतात. परंतु, पथक त्वरित उपलब्ध होऊ शकत नसेल तर दुसऱ्या दिवशी कारवाई केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
– मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या १,८१० लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, दररोज ६६ वातानुकूलित लोकलमधून ७८ हजार प्रवासी प्रवास करतात
.- मध्य रेल्वेला २५ मे २०२४ ते १० मार्च २०२५ या कालावधीत एकूण ८,७३५ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी १५७ तक्रारी तात्काळ सोडवण्यात आल्या. तर, दुसऱ्या दिवशी ८,५७८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
– प्राप्त तक्रारींचा सखोल तपास केल्यानंतर २५ मे २०२४ ते १० मार्च २०२५ या कालावधीत वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट आणि योग्य तिकिटे नसलेले ८२ हजार ७७६ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २.७१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. यावरून दररोज सरासरी ३४८ प्रवासी योग्य तिकिटे न घेता प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच दररोज सरासरी १.१४ लाख रुपये दंड वसूल करण्यात येत आहे.
– २०२४-२५ या आर्थिक वर्षात (९ मार्च २०२५ पर्यंत) वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवासाची ९२,२१७ प्रकरणे आढळली. या प्रकरणांतून ३.०३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. तर २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४०,३३५ प्रकरणांमध्ये १.३३ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत विनातिकीट प्रवासाच्या प्रकरणांच्या संख्येत १२८ टक्के वाढ आणि दंडाच्या रकमेत १२६ टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.