मध्य रेल्वेकडून पावसाळी नियोजन; आरक्षण केलेल्या प्रवाशांची अडचण
मुंबई : यंदाच्या पावसात मेल-एक्स्प्रेस गाडय़ांचे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात होणारे नुकसान टाळतानाच वक्तशीरपणा राहावा यासाठी ३१ मेल-एक्स्प्रेसह पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडून अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे कितपत फायदा किंवा नुकसान होऊ शकते याची आणखी माहिती रेल्वेकडून घेतली जात आहे.
मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाडय़ा रद्द करण्याची वेळ मध्य रेल्वेवर येते. त्यामुळे मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची माहिती हवामान खात्याकडून उपलब्ध होताच त्या दिवशी दररोज धावणाऱ्या १,७३२ ऐवजी १ हजार ३८४ फेऱ्याच चालविण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला आहे. त्यामुळे होणारा गोंधळ व आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते, अशी त्यामागील शक्कल आहे. या प्रस्तावानंतर आता मध्य रेल्वेने मेल-एक्स्प्रेस गाडय़ाही रद्द करण्याचा अजब प्रस्ताव तयार केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवरही परिणाम होतो. पाणी साचल्याने इंजिनमध्ये बिघाड, रुळावरून गाडय़ा घसरणे, रुळावर पाणी साचल्याने मेल-एक्स्प्रेस गाडय़ा जागीच उभ्या राहण्यासह अनेक समस्या सतावतात. ही समस्या निर्माण झाल्याने त्याचा परिणाम अन्य मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवरही होतो आणि वेळापत्रकही बिघडते. एकंदरीत हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी ३१ मेल-एक्स्प्रेस गाडय़ा जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत रद्द करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने तयार केला आहे. एकाच मार्गावर तीन ते चार गाडय़ा धावत असतील तर यातील एक ते दोन गाडय़ा रद्द राहतील आणि पावसाळ्यात गाडय़ांचा वेगही राखू शकताना मार्गही सुरळीत राहील, अशी देखील त्यामागील कल्पना असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. या प्रस्तावावर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. ऑगस्टपर्यंतच्या गाडय़ा रद्द केल्यास त्यांचे आरक्षण आधीच सुरू झालेले आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते याचा विचार करत यावर अजून निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मुंबईत अनेक मेल-एक्स्प्रेस गाडय़ा भायखळा ते कुर्ला या पट्टय़ात रात्रभर उभ्याच राहिल्या होत्या. त्या वेळी रेल्वे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने मेल-एक्स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. त्यासाठी रात्रभर मोहीम चालविण्यात आली होती.