मुंबई : मध्य रेल्वेवरील टिटवाळा – खडवलीदरम्यान गुरुवारी सकाळी मालगाडीची कपलिंग तुटली. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला.

मध्य रेल्वेवरील टिटवाळा – खडवलीदरम्यान गुरुवारी सकाळी ९.२२ च्या सुमारास एका मालगाडीचे कपलिंग तुटले. त्यामुळे मालगाडीचा खोळंबा झाला. त्याचा परिणाम लोकल सेवेवर झाला. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल विलंबाने धावत होत्या. डाऊन दिशेला येणारी लोकल वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. मालगाडीमध्ये बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला मिळताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी मालगाडीचे कपलिंग जोडण्याचे काम हाती घेतले. कपलिंग जोडण्याचे काम सुमारे २० मिनिटांनी पूर्ण झाले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ९.४७ च्या सुमारास मालगाडी मार्गस्थ झाली. या घटनेमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले. प्रवाशांना कार्यालयात जाण्यास प्रचंड विलंब झाला. कसारा, आसनगाव येथील छोट्या व्यापाऱ्यांसह सर्वांनाच रेल्वे सेवेच्या गलथान कारभारामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

यामुळे डाऊन दिशेला येणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. कसाराहून येणारी गरीब रथ मेल आसनगावला थांबविण्याची मागणी करण्यात आली. वासिंद, खडवली स्थानकातील प्रवाशांनी स्थानक व्यवस्थापकांकडे अशी मागणी करावी, असे आवाहन कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने करण्यात आले.

रेल्वेगाड्यांतील प्रवाशांना फटका

कल्याण हे जंक्शन असून विविध भागातून कल्याण येथे रेल्वेगाड्या येतात आणि पुढे मार्गस्थ होतात. गुरुवारी गाडी क्रमांक ०९६२७ अजमेर-सोलापूर रेल्वेगाडी कल्याण येथे पोहचण्यास पाच तास विलंब झाला. तसेच कल्याण येथे पोहचण्यापूर्वी रेल्वेगाडी एक तास रखडली होती.  पाणी किंवा कोणतेही खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली. दरम्यान, ही रेल्वेगाडी मुंबई विभागात ४.२३ तास उशिरा पोहोचल्याने कल्याण येथे फलाट उपलब्ध झाला नाही. रेल्वेचा फलाट आणि मार्ग मोकळा होताच प्रवास पुन्हा सुरू झाला. विलंब कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मध्य रेल्वेच्या विभागाकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा विविध कारणांमुळे विलंबाने धावते. त्यामुळे एकाच लोकलमध्ये दोन ते तीन लोकलचे प्रवासी चढतात. गर्दीमय लोकलमधून प्रवास करणे प्रचंड जीवघेणे होत आहे. घरातून लवकर निघाल्यानंतरही इच्छित लोकल मिळत नसल्याने, कार्यालयात पोहचण्यास विलंब होतो. तीन वेळा कार्यालयात पोहचण्यास उशिरा झाल्यानंतर पगार कापला जातो, अशी व्यथा प्रवाशांनी मांडली.

Story img Loader