ऐनगर्दीच्या वेळी केलेल्या मेगाब्लॉकमुळे मुंबईत प्रवाशांचे हाल..

मंगळवारी लोकल ठप्प झाल्याने सक्तीची सुट्टी घ्यावी लागलेल्या प्रवाशांनी बुधवारी कार्यालय गाठण्यासाठी मेगाब्लॉक वगैरे धाब्यावर बसवत लोकल पकडण्यासाठी गर्दी के ली. मात्र ऐनगर्दीच्या वेळी रद्द झालेल्या फेऱ्या, गाडय़ांना लोंबकळणारे प्रवासी, ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर लोकल शिरताच आतल्यांना बाहेर खेचून आत शिरू पाहणाऱ्या प्रवाशांचा लोंढा, गाडीतली जीव गुदमरवणारी गर्दी असा भयाण अनुभव घेत चाकरमान्यांनी कसेबसे कार्यालय गाठले.

ठाणे ते सीएसटी प्रवासादरम्यान ठाण्यातूनच बहुतांश गाडय़ा भरून येत असल्याने विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव या स्थानकांवरील प्रवाशांना गाडय़ांमध्ये प्रवेश करणेही दुरापास्त झाले होते. आधीच्याच गाडय़ांमध्ये दारात धोकादायक पद्धतीने लटकून येणारे प्रवासी पाहिल्यावर अनेकांना पुढची गाडी कधी येते याची वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते. डोंबिवली-दिवा स्थानकातील अनेक प्रवाशांनी डाऊन गाडय़ांनी कल्याण गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र डाऊनच्या गाडय़ाही दिव्यावरूनच भरून येत असल्याने डोंबिवली-कल्याण स्थानकांतील प्रवाशांना गाडय़ांमध्ये चढताच येत नव्हते, अशी तक्रार प्रवाशांनी केली.

काही प्रवाशांनी द्वितीय श्रेणीच्या डब्यात चढता येत नसल्याने प्रथम श्रेणीच्या डब्ब्यातून प्रवास केला. मात्र या डब्ब्यांमध्ये कसे तरी उभे राहता येईल अशीच अवस्था होती. याबाबत अनुभव सांगताना सोनेश्वर पाटील हा तरूण म्हणाला की, लोअर परळला कामावर जाण्यासाठी विक्रोळी रेल्वे स्थानकात आलो. मात्र तेथे लोकलची वाट बघत थांबलेल्यांची मोठी गर्दी उभी होती. त्यातील काही प्रवाशांनी आधीच्या गाडय़ांना गर्दी असल्याने त्या सोडल्या होत्या. सुमारे १५ मिनिटांनी एक लोकल गाडी स्थानकावर आली. त्या गाडीलाही प्रचंड गर्दी होती. द्वितीय श्रेणीच्या डब्ब्यात प्रवासी आधीच दरवाज्यात लटकत उभे असल्याने तेथे प्रवेश मिळणे महाकठीण होते. प्रथम श्रेणीच्या डब्ब्याकडे गेलो तर त्या ठिकाणीही प्रचंड गर्दी होती. मात्र डब्ब्यात कसेबसे शिरता आले. तेथेही चेंगराचेंगरी होते की काय अशीच स्थिती होती.

डोंबिवली स्थानकात प्लॅटफॉर्मही खचाखच भरले होते आणि ब्रिजवरही खच्चून गर्दी होती. तिथे उभे राहणेही अवघड झाले होते, असे प्रवाशांनी सांगितले. बऱ्याच वेळानंतर कल्याणवरून डोंबिवली स्थानकात गाडी शिरली. मात्र गाडीत आधीच लटकणाऱ्या महिलांना स्थानकावरील प्रवाशांनी चढताना बाहेर खेचल्यामुळे अनेकजणी स्थानकावर पडल्या. त्यांना सावरण्याच्या नादात डोंबिवलीतील प्रवाशांना चढताच आले नाही, असा अनुभवही एका प्रवाशाने सांगितला. या महिला स्थानकावरच पडल्या म्हणून वाचल्या, पण त्यांच्या जीवावर बेतले असते तर ही जबाबदारी कोणाची?, असा संतप्त सवालही प्रवासी करत होते.

ठाण्याच्या पुढेही हीच गर्दी कायम होती. शीव स्थानकात दुपारी बारा ते सव्वा एक च्या दरम्यान दादरकडे जाणाऱ्या तब्बल पाच ते सहा गाडय़ा आल्या. परंतु प्रवाशांना एकाही गाडीत सहज चढणे शक्य नव्हते. त्यातल्या बऱ्याच गाडयांच्या दाराशी आधीपासूनच प्रवाशी लटकलेले होते. अशा एकामागून एक पाच ते सहा गाडय़ा सोडाव्या लागत होत्या. बारा ते सव्वा एक दरम्यान आलेल्या गाडय़ांपैकी काही शीव स्थानकातच ठराविक अंतरावर जाऊ न थांबत होत्या, तर काही शीव-माटुंगा स्थानकाच्या दरम्यान थांबत होत्या. विशेष म्हणजे प्रत्येक गाडीत चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची बाचाबाची होत होती. काही मंडळी तर अगदी प्रवाशांची गचांडी धरत होते.

एकंदर अशा हिंसक गर्दीला घाबरून अनेकजण स्थानकातच ताटकळत उभे होते. काही लोक या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत होते. दोन दिवसांच्या गैरसोयीनंतरही धीम्या गतीने सुरु असलेल्या रेल्वे वाहतूकीबद्दल लोकलच्या गर्दीत अडकलेला प्रत्येक प्रवासी भरभरून तोंडसुख घेत होता. दुपारी एक-दीड पर्यंत हा प्रकार सुरू असल्याने अनेकांनी वाट पाहून आजही सुट्टी घेत घरचा मार्ग पत्करला.

पोलिसांनी उतरवले

अनेक स्थानकांमध्ये १५ किंवा १२ डब्यांच्या गाडय़ांच्या ऐनवेळी होणाऱ्या घोषणा, त्यामुळे होणारी पळापळ, धीमी लोकल-जलद लोकल कुठली याबाबत नसलेली स्पष्टता यामुळे प्रवाशांच्या गोंधळात आणखीनच भर पडली. अनेक ठिकाणी स्थानकांवर रेल्वे पोलीस तैनात होते. त्यांनी महिल्यांच्या डब्यात लटकणाऱ्या महिला प्रवाशांनाही खाली ओढून स्थानकावर उतरवले. लटकू नका, लोकलमधून पडाल, अशा सूचना देत महिलांना आणि पुरूष प्रवाशांनाही खाली उतरण्याची विनंती पोलिस करताना दिसत होते. मात्र मंगळवारी रजा झाली असल्याने बुधवारी काहीही करून कार्यालय गाठणे गरजेचे आहे, असे सांगत अनेकांची पोलिसांना धुडकावत लोकलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी झुंज सुरु होती.

Story img Loader