कधीही न थांबणाऱ्या मुंबईतील रेल्वे सेवा दरवर्षी किमान एकदा तरी पावसासमोर कोलमडते. दरवर्षी मध्य रेल्वेवर पाणी तुंबण्याच्या जागा ठरलेल्या आहेत. मात्र यंदा या जागांमध्ये काही नव्या स्थानकांची भर पडणार आहे. मध्य रेल्वेवर सध्या सुरू असलेल्या डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाच्या कामामुळे हे संकट ओढावणार असल्याचे रेल्वेतील काही वरिष्ठ अधिकारीच सांगतात.
करीरोड, माटुंगा-शीव, कुर्ला-विद्याविहार, मुलुंड-भांडुप या स्थानकांदरम्यान पाणी दरवर्षीच तुंबते. त्यामुळे या स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे आणि महापालिका पाणी उपसण्याच्या पंपांची सोय करून ठेवते. मात्र गेल्या वर्षी भायखळ्याजवळ पाणी तुंबल्याने रेल्वे प्रशासन आश्चर्यचकीत झाले होते. मात्र यंदा मध्य रेल्वे प्रशासनावर आश्चर्यचकीत होण्याची वेळ वारंवार येणार आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान सध्या डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाचे काम चालू आहे. ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना आता ही मुदत जूनच्या शेवटापर्यंत लांबली आहे. डीसी-एसी परिवर्तनासाठी सध्याच्या ओव्हरहेड वायर काही प्रमाणात खाली किंवा वर कराव्या लागणार आहेत. मात्र मुंबईतील जुन्या पुलांची रचना बघता या ठिकाणी ओव्हरहेड वायर वर घेणे शक्य नाही. परिणामी या पुलांजवळ रेल्वेरुळ खाली करण्यात आले आहेत. या पुलांमध्ये परळ, करीरोड, चिंचपोकळी, भायखळा, मशीद या स्थानकांजवळच्या पुलांचा समावेश आहे. करीरोड, परळ, चिंचपोकळी हा भाग आधीच खोलगट असल्याने येथे दरवर्षी हमखास पाणी तुंबते. या भागात आता रेल्वेरुळ खाली घेतल्याने रेल्वे पुलांखालील भाग अधिकच खोलगट झाला आहे. त्यामुळे आता येथे पाऊस जास्त पडल्यास दरवर्षीपेक्षा जास्त पाणी तुंबणार आहे. त्याचप्रमाणे मशीद, भायखळा, सँडहर्स्ट रोड या स्थानकांदरम्यानही यंदा पहिल्यांदाच पाणी साचून रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच स्पष्ट केले.

Story img Loader