मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विलंबाने धावत असल्याचा फटका पुन्हा शनिवारी सायंकाळी मध्य रेल्वे प्रवाशांना बसला. एका एक्स्प्रेस गाडीत आपत्कालीन साखळी खेचल्याने, तर सीएसएमटी-टिटवाळा लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा लोकल वेळापत्रकावर परिणाम झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दिशेने जाणाऱ्या आणि सुटणाऱ्या धीम्या आणि जलद लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या.
सायंकाळी ७.२८ वाजता सीएसएमटी-टिटवाळा लोकलमध्ये ठाणे स्थानकजवळ तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी सात मिनिटे लागली. त्यानंतर गाडी क्रमांक १२२८९ नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसमध्ये एका डब्यात प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचली. सीएसएमटी स्थानकाजवळ झालेल्या या घटनेमुळे सीएसएमटीला येणाऱ्या आणि सुटणाऱ्या जलद लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले. तर ठाणे येथील घटनेमुळे धीम्या लोकल विस्कळीत झाल्या. लोकल दहा ते पंधरा मिनिटे विलंबाने धावू लागल्याने कामावरून घरी परतणाऱ्यांना त्याचा फटका बसला.
प्रवाशांना लोकल गाडय़ांना गर्दीचा सामना करावा लागला. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रक सातत्याने विस्कळीत होत आहे. तांत्रिक बिघाडबरोबरच मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये विनाकारण किंवा छोटय़ा कारणांसाठी आपत्कालीन साखळी खेचल्याच्या घटना होत असून त्यामुळेच लोकल वेळापत्रक बिघडल्याचे कारण मध्य रेल्वेकडून दिले जात आहे.