मुंबई : रेल्वे प्रवास करून प्रवाशांना प्रचंड थकवा येतो. बराच वेळ लोकलमध्ये उभे राहून पाय दुखतात, बॅगमुळे खांदे आणि लोकलचे हॅन्डल पकडून हात दुखतात. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीने प्रवास करून प्रवाशांना प्रचंड आळस येतो. प्रवाशांचे हे दुखणे कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे मसाज चेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मुंबईकरांचा दररोजचा रेल्वे प्रवास धकाधकीचा असतो. प्रवासात प्रवाशांना दुखणे सहन करावे लागते. तासन्तास उभे राहून गुडघे, पाय प्रचंड दुखतात. तसेच धक्काबुक्कीमुळे शारिरीक वेदना होतात. यासह लांबपल्ल्याच्या रेल्वेगाडीने प्रवास करून प्रवाशांना पाठदुखी, अंगदुखीचा त्रास होतो. प्रवाशांना भेडसावणारी समस्या ओळखून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण स्थानकावर आरामदायी मसाज खुर्च्या ठेवल्या आहेत. कल्याण स्थानकावर आरामदायी मसाज खुर्च्या उपलब्ध करण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी ५.११ लाख रुपये वार्षिक परवाना शुल्क संबंधितांनी रेल्वेला अदा केले. ज्याचे एकूण करार मूल्य १५.३४ लाख रूपये आहे. तर, लोकमान्य टिळक टर्मिनसवर लिलावाद्वारे ११ मार्च रोजी ४.६५ लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्क मध्य रेल्वेला प्राप्त झाले आहे. ज्याचे एकूण करार मूल्य १६.४६ लाख रुपये आहे. या लिलावाद्वारे अतिरिक्त महसूल प्राप्त होणार असून, प्रवाशांना वाढीव सुविधांचा लाभ मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आली.

मध्य रेल्वेला जाहिरात कंत्राटाद्वारे लाखोंची कमाई

रोहा स्थानकासाठी १२ मार्च २०२५ रोजी जाहिरात करार करण्यात आला असून रोहा स्थानकासाठी १.८५ लाख रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्क आकारून जाहिरात कंत्राट देण्यात आले आहे. त्याच्या एकूण कंत्राटाची किंमत ५.५५ लाख रुपये झाली.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव तेजस एक्स्प्रेसच्या आसनाच्या हेडरेस्ट आणि शेवटच्या आसनाच्या पाठीमागील भागावर जाहिराती करण्यासाठी १३ मार्च २०२५ रोजी ९.९० लाख रुपये वार्षिक परवाना शुल्क देण्यात आले. त्याचे एकूण करार मूल्य २९.७० लाख रुपये आहे.विक्रोळी, चुनाभट्टी आणि टिळक नगर स्थानकांवर एलईडी स्क्रीनद्वारे जाहिरात करण्यासाठी १५ मार्च २०२५ रोजी अनुक्रमे २४ लाख, ८ लाख आणि ६ लाख रुपयांना वार्षिक परवाना शुल्कासह कंत्राट देण्यात आले. एकूण कराराची किंमत २.०१ कोटी रुपये आहे. हे करार स्थानकांवरील नॉन-डिजिटल मीडिया जाहिरातींव्यतिरिक्त आहेत.

ठाणे स्थानकावर दोन ठिकाणी विनावातानुकूलित प्रतीक्षालय उभारण्यासाठी अन्य संस्थांना कंत्राट देण्यात आले आहे. फलाट क्रमांक २ वरील प्रतीक्षालयासाठी ५२.४९ लाख रुपये, तर पादचारी पुलावरील प्रतीक्षालयासाठी ७.८६ लाख रुपये असे एकूण १.८१ कोटी रुपयांचे करार करण्यात आले आहेत. विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी १८ ते २१ मार्च २०२५ दरम्यान निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Story img Loader