अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्यांना दंड; तीन महिन्यांत मध्य रेल्वेवर दोन हजार गुन्हे दाखल
कोणत्याही महिन्यात लांब पल्ल्याच्या कोणत्याही गाडीची आरक्षणे मिळणे कठीण असताना सध्या दुसऱ्याच्याच नावावर असलेल्या आरक्षित तिकिटावर प्रवास करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. आपल्या नियोजित प्रवासासाठी आरक्षित तिकीट न मिळाल्यास अनेक जण उभ्याने प्रवास करणे पसंत करतात. त्याऐवजी दुसऱ्याच कोणाच्या तरी नावे आरक्षित असलेले आणि तिकीट थोडे जास्त पसे देऊन विकत घेत त्या तिकिटावर प्रवास करण्याचे प्रकार वाढले आहेत. मध्य रेल्वेवर गेल्या तीन महिन्यांत अशी दोन हजारांहून अधिक प्रकरणे पकडली गेली असून त्यांच्याकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आता ही आरक्षित तिकिटे कोण विकतो, याचा छडा लावण्यात येणार आहे.
उन्हाळी सुटय़ांमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी चार चार महिने आधीपासून आरक्षण करतात. मात्र तरीही अनेकांना प्रतीक्षा यादीला सामोरे जावे लागते. प्रतीक्षा यादीत नाव असताना रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रवास करता येत नाही. त्यामुळे आता प्रवासी आरक्षित तिकीट मिळवण्यासाठी खटपट करतात. अशा वेळी दलालांनी ही संधी साधली असून आपल्याजवळील आरक्षित तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना किंवा दुसऱ्या प्रवाशांना विकण्याचा धंदा सुरू केला आहे.मात्र आरक्षित तिकीट ज्याच्या नावे असेल, त्यानेच त्या तिकिटावरून प्रवास करणे बंधनकारक आहे. अन्यथा रेल्वेतर्फे कारवाई करण्यात येते. रेल्वेने २०१६ या वर्षांत पहिल्या तीन महिन्यांत अशा २००४ केसेस पकडल्या आहेत.
या केसेसमधून रेल्वेने १४.३० लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. अशा प्रकारे दुसऱ्याच्या नावावर आरक्षित असलेले तिकीट विकत घेण्यासाठी प्रवासी जादा पसे मोजतात. मात्र हे तिकीट वापरल्याबद्दल त्यांना दंड भरावा लागतो. उन्हाळी सुटय़ांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांना अशा प्रकारे अनधिकृत तिकिटावर प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा