उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व महिला प्रवाशांना मध्य रेल्वेने खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरी स्थानकांवर सहा महिन्यांमध्ये महिलांसाठी खास स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून त्याची सुरुवात ठाणे आणि दादर स्थानकांपासून करण्यात येणार आहे. तर १५ डब्यांच्या गाडीमध्ये महिलांसाठी पाच डबे राखीव राहणार आहेत.
उपनगरी रेल्वेच्या महिला प्रवाशांना नेहमीच स्वच्छतागृहांची समस्या भेडसावत असते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे केवळ नाममात्र असतात तर काही ठिकाणी ती गैरसोयीची असल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांकडून करण्यात येतात. अनेक स्थानकांवर महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही स्वच्छतागृहे नाहीत. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या समस्येचा उल्लेख करत महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निधीची तरतूद केल्याचे जाहीर केले होते. जागतिक महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेतील विविध विभागांमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी मध्य रेल्वेला अर्थसंकल्पामध्ये पुरेसा निधी मिळाला असून महिलांसाठी सर्व स्थानकांवर सोयीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ठाणे, दादर येथून महिला प्रवासी मोठय़ा प्रमाणात प्रवास करत असतात म्हणून या स्थानकांना प्राधान्य देण्यात आले असून सहा महिन्यात मध्य आणि हार्बरच्या सर्व स्थानकांवर ही स्वच्छतागृहे उभारण्यात येतील, असे ते म्हणाले. या स्वच्छतागृहांची देखभाल रेल्वेकडूनच करण्यात येणार असून ती २२ तास सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले.
१५ डब्यांच्या गाडीमध्ये महिलांसाठी पाच पूर्ण डबे राखीव ठेवण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापकांनी यावेळी सांगितले. सध्या १५ डब्यांच्या गाडीमध्ये कल्याण दिशेचे दोन डबे महिलांसाठी राखीव असतात. तर सीएसटीच्या दिशेचा पहिला डबा व आणखी एक डबा महिलांसाठी राखीव असून त्या व्यतिरिक्त प्रथम वर्गाचे महिलांचे चार अर्धे डबे असतात. यात आणखी दुसऱ्या वर्गाच्या एका महिला डब्याची भर पडणार आहे. महिलांसाठी एक विशेष महिला गाडी सुरू करण्याची मागणी करण्यात येत असून गाडी उपलब्ध नसल्याने ती मान्य करता येणार नाही. त्याऐवजी आणखी एक डबा वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र हे डबे सलग असतील की नाही याबाबत विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा