डीसी-एसी मध्य रेल्वेची सेवा मंगळवारीही कोलमडलेलीच राहिली. मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाबरोबरच दादर स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाच तास रखडली होती. त्यानंतर संध्याकाळी विक्रोळी स्थानकाजवळ ठाण्याला जाणाऱ्या एका गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा एकदा वाहतुकीला फटका बसला. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले.
मंगळवारी सकाळी ७.१२ वाजता दादर स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने अप दिशेकडील धिम्या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या गाडीच्या मागे सहा गाडय़ा अडकल्या होत्या. त्यानंतर विद्याविहार ते माटुंगा या दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली होती. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी तब्बल दोन तास लागले. त्यामुळे गाडय़ा खोळंबल्या आणि वाहतूक तब्बल तास ते दीड तास उशिराने सुरू होती. यामुळे ५५ सेवा रद्द करण्यात आल्या.
संध्याकाळीही गोंधळ
संध्याकाळी परिस्थिती पूर्ववत होते तोच, विक्रोळी येथे डाउन धिम्या मार्गावर एका गाडीत तांत्रिक बिघाड झाला. संध्याकाळी ५.२०च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर धिम्या मार्गावर गाडय़ांची रांग लागली. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी २५ मिनिटांचा कालावधी लागला. मात्र तोपर्यंत वाहतुकीचा चांगलाच बोजवारा उडाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतच होती.दरम्यान, हार्बर मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरानेच सुरू होती. पश्चिम रेल्वेवरही पावसामुळे गाडय़ा उशिरानेच धावत होत्या.
मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेलीच
डीसी-एसी मध्य रेल्वेची सेवा मंगळवारीही कोलमडलेलीच राहिली. मंगळवारी सकाळी मुसळधार पावसाबरोबरच दादर स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल पाच तास रखडली होती.
First published on: 24-06-2015 at 12:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway service affected due to overhead wire problems