दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान विद्युतप्रवाहात बिघाड झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे सहा उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्याने कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दादर टर्मिनस आणि सहा क्रमांकाच्या मार्गावरील क्रॉसिंगवरच हा बिघाड झाल्यामुळे या मार्गावर असलेली बदलापूर-सीएसटी गाडी मध्येच बंद पडली आणि त्यापाठोपाठ पाच उपनगरी गाडय़ा मार्गात रखडल्या. यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या उपनगरी गाडय़ा विक्रोळी येथूनच धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. तब्बल अध्र्या तासाने विद्युतप्रवाह पूर्ववत झाला आणि मार्गात अडकलेल्या गाडय़ा सीएसटीकडे मार्गस्थ झाल्या. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ तीन गाडय़ा विक्रोळीवरून धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या होत्या. तर सहा गाडय़ा रद्द करण्यात आल्या. ऐन गर्दीच्या वेळी उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे सीएसटीवरून कल्याणकडे जाणाऱ्या उपनगरी वाहतुकीवर परिणाम झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा