कल्याण- ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही कोलमडली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने कार्यालयात जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. ‘मरे’ सततच्या गोंधळाबद्दल प्रवाशांमध्ये   प्रचंड संताप होता़
सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या अप धिम्या रेल्वेमार्गारील रुळाला तडा गेल्याने कल्याण ते दिवादरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळविण्यात आली. तोपर्यंत कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी उसळली होती. धीम्या गती मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावरून काढल्याने ठाकुर्ली, कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा त्याचा फटका बसला.
अध्र्या तासात रूळ दुरूस्तीचे काम पूर्ण करून सेवा पुर्ववत केल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला. असला तरी या मार्गावरील सेवा दुपापर्यंत कोलमडली होती. त्यामुळे गाडय़ा २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. बुधवारी रात्रीही मध्य रेल्वेची सेवा अशीच कोलमडली  होती.
अन्य एका घटनेत आटगाव रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती रद्द करून कळवा कारशेडमध्ये आणण्यात आली. दुपारची वेळ असल्याने त्याचा प्रवाशांना बसला नाही.

लोकलमधून तरुण पडला
गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडल्याने मोहम्मद असिफ अन्सारी हा २५  वर्षांचा  तरुण गंभीर जखणी झाला असून त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अन्सारी दोन ट्रॅकमध्ये गंभीर अवस्थेत पडल्याचे पाहिल्यानंतर काही प्रवाशांनी ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली़
दरम्यान, आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गालगतही एक महिला जखमी अवस्थेत आढळली. या महिलेचे नातेवाईक रेल्वेमध्ये नोकरीला आहेत. मात्र तिचे नाव संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून सांगण्यात येत नव्हते.

Story img Loader