मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या यार्ड परिसरात गाडय़ा रुळावरून घसरण्याच्या प्रकारामुळे हतबल झालेल्या मध्य रेल्वेला रविवारी याच यार्ड परिसरातील ओव्हरहेड वायरने दगा दिला. मसजीद-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील ओव्हरहेड वायर रविवारी सकाळी सातच्या सुमारास तुटल्यामुळे उपनगरीय, तसेच लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक सपशेल कोलमडले. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी साडेचार तासांपेक्षाही जास्त काळ लागल्याने पुन्हा एकदा प्रवाशांचे मेगाहाल झाले. दरम्यान, या बिघाडामुळे लोकलच्या २६ गाडय़ा रद्द कराव्या लागल्या.
रविवारी अप जलद मार्गावर मस्जिद-सीएसटी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटून गाडय़ांची वाहतूक ठप्प झाली. सकाळी ६.५१ वाजता हा बिघाड झाल्यानंतर अप जलद गाडय़ा अप धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या. परिणामी सकाळी मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा खोळंबल्या.
हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी १०.३६ वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतरही ११ च्या सुमारास उद्यान, विदर्भ आणि सिंहगड या गाडय़ा एकापाठोपाठ एक भायखळा स्थानकापर्यंत उभ्या होत्या. या बिघाडामुळे डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावर वळविण्यात आली. या एकूण गोंधळामुळे उपनगरी गाडय़ा अर्धा ते पाऊण तास विलंबाने धावत होत्या.
दरम्यान, रविवारी मध्य रेल्वेचा प्रस्तावित मेगाब्लॉक असल्याने आधीच गाडय़ांची संख्या कमी होती. तसेच गाडय़ा विलंबाने धावत होत्या. त्यात याही बिघाडाची भर पडल्याने गाडय़ा अधिकच कूर्मगतीने धाऊ लागल्या. परिणामी अनेक स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा