मुंबई : ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह मुंबईला बुधवारी पावसाने झोडपून काढले. दिवसभर शहरांतील काही भाग आणि उपनगरांत कोसळणाऱ्या पावसात तग धरून असलेली मुंबई सायंकाळी मात्र पुरती कोलमडून गेली. सायंकाळी शहरातील अनेक भागांत २०० मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांतील रेल्वे स्थानकांवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली. रात्री उशीरापर्यंत गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना स्थानकांवरच मुक्काम ठोकावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारनंतर वारा आणि पावसाचा जोर वाढला. संध्याकाळच्या पावसामुळे अनेक सखल भागांत पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विद्याविहार आणि कांजूरमार्ग दरम्यान रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल व हजारो प्रवासी अडकून पडले. पावसात भिजत गर्दीतून वाट काढत, रेल्वे स्थानक प्रवाशांनी गाठले. रात्री ८ वाजता रेल्वे रुळावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्याने, लोकलचा वेग मंदावला. त्यामुळे लोकल वेळापत्रक कोलमडले.

हेही वाचा >>>गुरूवारी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर; हवामान विभागाच्या रेड अलर्टनंतर प्रशासनाचा निर्णय

रात्री ८ वाजेनंतर सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना एकही लोकल मिळाली नाही. भायखळा, दादर, परळ, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकात प्रचंड गर्दी झाली. जोरदार पावसाचा मारा सहन करत अनेक प्रवासी रेल्वे स्थानकात येत होते. अनेकांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठीही पायपीट करावी लागली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याविहार ते ठाणे या दरम्यान रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास मुख्य मार्गावरील धीम्या लोकल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. जलद लोकल उशिराने सुरू होत्या. कांजूरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही लोकल मार्गावर ताशी ३० किमी वेगाचे निर्बंध घालण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. विजांचा कडकडाट हे परतीच्या पावसाचं लक्षण असले तरी परतीचा पाऊस सर्वदूर पडत नाही. तसेच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सध्या पडतोय तो परतीचा पाऊस नाही. मात्र, ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे सुनिल कांबळी यांनी सांगितले.

मुंबई शहर व उपनगरांत गुरुवारीही पावसाची शक्यता असल्याने मुंबई महापालिका परिक्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज २६ सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेने जारी केले. ठाणे महापालिकेनेही आपल्या क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे.

या भागांची ‘तुंबई’

कुर्ला, चेंबूर-शेल कॉलनी, वि. ना. पुरव मार्ग, कुर्ला नेहरू नगर, शीतल सिनेमा कुर्ला, विक्रोळी, दादर टीटी, अंधेरी सबवे, मानखुर्द, वडाळा, वांद्रे, साईनाथ सबवे मालाड, कांदिवली, लालबाग – परळ, गोरेगाव, टिळक नगर, भांडुप एलबीएस मार्ग, मुलुंड, घाटकोपर, विद्याविहार, गोल देऊळ, भेंडी बाजार, साकीनाका, हिंदमाता

दादरवरून विक्रोळीला जाण्यासाठी लोकल पकडली. गाडी प्रचंड थांबत-थांबत चालली होती. विद्याविहार ते घाटकोपर प्रवास करण्यासाठी तासभर लागला. स्वप्नील पवार, प्रवासी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway stopped due to heavy rains mumbai amy