मध्य रेल्वेचे तीन कर्मचारी वेगवेगळ्या रेल्वे अपघातात एकाच दिवशी मृत्यूमुखी पडण्याची घटना शुक्रवारी घडली. सहाय्यक ड्रायव्हर, शंटिंग मास्तर आणि एक गँगमन अशा तिघांचा मृत्यू काम करत असतानाच झाला आहे. कुर्ला येथील डिझेल इंजिन विभागातील सहाय्यक ड्रायव्हर आकाश मेश्राम दादर यार्डामध्ये एका गाडीला इंजिन जोडण्याचे काम करत होते. गाडीला इंजिन लावून ते बाजूला होत असतानाच यार्डातच बाजूच्या मार्गावर असलेल्या गाडीने त्यांना धडक दिली. मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी सीएसटी यार्डात काम करणारे शंटिंग मास्टर जगदीश बन्सीधर हे फलाट क्रमांक १० जवळ एका गाडीच्या शंटिंगची पाहणी करत असताना मागून आलेल्या इंजिनची धडक त्यांना बसली. बन्सीधर यांना तात्काळ उपचारासाठी सेंटजॉर्जमध्ये नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, घाटकोपर-विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळांची तपासणी करणाऱ्या एका गँगमनला सकाळी ९.१५ वाजता कोल्हापूरकडे निघालेल्या कोयना एक्स्प्रेसने जोराची धडक दिली. या धडकेत गँगमनचा जागीच मृत्यू झाला. या गँगमनचे नाव समजू शकलेले नाही.