मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या म्हणजे रविवारी महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर कल्याण-ठाणे या स्थानकांदरम्यान, कल्याण-अंबरनाथ या दरम्यान दोन्ही मार्गावर आणि कुर्ला-मानखुर्द या हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक आहे. कल्याण ते ठाणेदरम्यान मुंबईच्या दिशेने जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत जलद गाडय़ा ११ ते पावणेतीन या वेळेत धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. या गाडय़ा कल्याण ते ठाणे यादरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार असून ठाण्यापुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखाळा या स्थानकांवर थांबतील. या गाडय़ा आपल्या नियोजित वेळेपेक्षा २० मिनिटे उशिराने धावतील.
११.२२ ते २.५१ या वेळेत मुंबईकडून सुटणाऱ्या जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवरही थांबतील. धीम्या मार्गावरील गाडय़ा ११ ते ५ या वेळेत १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत.
कल्याण येथून बदलापूरच्या दिशेने १.३२ ते ३.१७ या वेळेत एकही गाडी सुटणार नाही. तर बदलापूरहून १.४९ ते ३.२२ या वेळेत मुंबईच्या दिशेने एकही गाडी जाणार नाही. मात्र बदलापूर ते कर्जत या दरम्यान खास शटल सेवा चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला ते मानखुर्द या स्थानकांदरम्यान ११ ते ३ या कालावधीत मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा १०.२३ ते ३.०१ या दरम्यान बंद राहतील. तर मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा १०.२० ते ३.०४ या दरम्यान धावणार नाहीत.
मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्लादरम्यान १०.३१, ११.४०, १२.५३ आणि १.४९ या वेळी आणि मानखुर्द ते पनवेल या दरम्यान १०.३५, ११.३४, १२.४५, १.४२ या वेळी या विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.

Story img Loader