तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या सहा महिन्यांत आणखी २६८ ‘एटीव्हीएम’ यंत्रे बसवण्याचे ठरवले आहे. या ‘एटीव्हीएम’ यंत्रांसाठी १८ डिसेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘एटीव्हीएम’ कार्यरत होतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. ‘एटीव्हीएम’ बरोबरच ‘फॅसिलिटेटर’ (‘एटीव्हीएम’च्या बाजूला प्रवाशांना तिकिट देण्यासाठी नेमण्यात आलेला माणूस) आणि जेटीबीएस (रेल्वेने नेमलेले अधिकृत तिकिट विक्रेते) या दोन प्रणालींचा प्रसार करूनही तिकीट खिडक्यांपुढील रांगा कमी करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे करत असल्याचे ते म्हणाले.
नवीन येणारी ही यंत्रे स्थानकांमध्ये एकाच ठिकाणी ठेवण्यात येतील. तसेच प्रत्येक स्थानकाबाहेर पडण्याच्या किंवा यात येणाऱ्या ठिकाणी किमान दोन ‘एटीव्हीएम’ बसवण्यात येणार आहेत. ज्या स्थानकांशी स्कायवॉक जोडला गेला आहे, तेथे स्कायवॉक आणि पादचारी पुलांवरही ‘एटीव्हीएम’ बसवली जातील. त्यामुळे येत्या काळात ‘एटीव्हीएम’द्वारे होणाऱ्या तिकीट विक्रीचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षाही वर जाईल, असा दावाही राणे यांनी
केला.
तिकीट विक्रीचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)
तिकीट विक्रीचे साधन २०१० २०१३
तिकीट खिडकी ६५ ५०
सीव्हीएम कुपन्स ३० ०५
एटीव्हीएम मशिन ०५ २५
जेटीबीएस प्रणाली – २०