मध्य रेल्वेवर होऊ घातलेल्या डीसी-एसी परिवर्तनाला लखनऊ येथील मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतलेल्या ‘प्रथम छपरी प्रवाशांना आवरा’ आणि ‘परिवर्तनामुळे वाढणाऱ्या वेगाला मर्यादा घाला’ या दोन आक्षेपांबाबत रेल्वे बोर्डाने खुलासा पाठवला आहे. या खुलाशावर सुरक्षा आयुक्त काय निर्णय घेतात त्यावर डीसी-एसी परिवर्तनाचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र याचा निर्णय काहीही झाला तरी ठाणे-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यांदरम्यान डीसी-एसी परिवर्तन होत नाही, तोपर्यंत या मार्गावर नव्या गाडय़ा चालणे शक्य नाही. त्यामुळे हे विद्युत प्रवाहाचे परिवर्तन मध्य रेल्वेचे प्रवासी आणि नव्या गाडय़ा यांच्या आड येत आहे.
मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या परिवर्तनाबाबतचे आक्षेप रेल्वे बोर्डाला कळवले होते. रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेशी चर्चा करून या आक्षेपांचे खंडन करणारे उत्तर पाठवले आहे. तसेच सुरक्षेबाबत सर्व काळजी घेण्यात आल्याची खात्रीही करून देण्यात आली आहे. आता मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या दरम्यान डीसी-एसी परिवर्तनाचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
रेल्वेमार्गावर येणाऱ्या नवीन बंबार्डियर गाडय़ा एसी विद्युत प्रवाहावर धावतात. त्यामुळे या गाडय़ा मध्य रेल्वेवर चालवायच्या असल्यास, मध्य रेल्वेवर एसी विद्युत प्रवाह असणे गरजेचे आहे. अन्यथा मध्य रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या वाढवणे अशक्य ठरणार आहे. याचा थेट फटका प्रवाशांना बसत असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लवकरात लवकर परवानगी मिळावी, यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader