मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने १८४ होळी विशेष रेल्वेगाड्या चालविल्या. यापैकी उत्तर प्रदेशात ३६ आणि कोकणात १४ होळी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. शिमगोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात लाखो नागरिक जातात. तसेच राज्यसह, देशभरातून अनेक जण शिमगोत्सवासाठी कोकणात जातात. परंतु, होळीनिमित्त मध्य रेल्वेने १४ विशेष रेल्वेगाड्या चालविल्याने प्रवाशांचा प्रवास अडचणीचा झाला.
होळीनिमित्त प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने महाराष्ट्र, गोवा, कोकण, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, हरियाणासाठी १८४ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ६२ रेल्वेगाड्या चालविल्या. परंतु, यामधील २८ रेल्वेगाड्या कलबुरगी ते दौंड (पुणे) दरम्यान चालविण्यात आल्या. तर, कोकणात १४ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे मुंबईतून कोकणात प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. तसेच यावर्षी पुण्यावरून कोकणात जाणारी एकही रेल्वेगाडी सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला. याउलट पुण्यावरून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली या राज्यात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अधिक होती.
महाराष्ट्रात ६२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या
– मुंबई – नागपूर ८ फेऱ्या
– पुणे – नागपूर ८ फेऱ्या
– मुंबई – नांदेड ४ फेऱ्या
– कलबुरगी – दौंड २८ फेऱ्या
– मुंबई – रत्नागिरी ६ फेऱ्या
– मुंबई – चिपळूण ८ फेऱ्या
———————————-
गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसाठी २८ होळी विशेष रेल्वेगाड्या
– मुंबई – मडगाव १६ फेऱ्या
– मुंबई – कन्याकुमारी (तामिळनाडू) ४ फेऱ्या
– मुंबई – तिरुवनंतपुरम (केरळ) ४ फेऱ्या
– कलबुरगी – बेंगळुरू (कर्नाटक) ४ फेऱ्या
उत्तर प्रदेशसाठी ३६ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या
– मुंबई – मऊ १० फेऱ्या
– मुंबई – बनारस ६ फेऱ्या
– मुंबई – गोरखपूर ८ फेऱ्या
– मुंबई – कानपूर ४ फेऱ्या आणि
– पुणे – गाजीपूर शहर ८ फेऱ्या
—————————
बिहारसाठी २६ होळी रेल्वेगाड्या चालवल्या
– मुंबई – दानापुर ८ फेऱ्या
– पुणे – दानापुर ८ फेऱ्या
– मुंबई – समस्तीपुर ४ फेऱ्या
– पुणे – मालदा २ फेऱ्या
– मुंबई – रक्सौल २ फेऱ्या
– मुंबई – सहरसा २ फेऱ्या
मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली, हरियाणासाठी ३२ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या
– पुणे – झाशी (मध्य प्रदेश) ४ फेऱ्या
– हडपसर – झाशी (मध्य प्रदेश) ४ फेऱ्या
– पुणे – इंदौर (मध्य प्रदेश) ६ फेऱ्या
– नाशिक रोड – धनबाद (झारखंड) १० फेऱ्या
– पुणे – हजरत निजामुद्दीन (दिल्ली) ४ फेऱ्या
– हडपसर – हिसार (हरियाणा) ४ फेऱ्या