प्रवाशांना ऑगस्ट महिनाअखेपर्यंत डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाची स्वप्ने दाखवणाऱ्या मध्य रेल्वेने पुन्हा कच खाल्ली आहे. मध्य रेल्वेवरील गाडय़ा १५०० केव्ही डीसी विद्युतप्रवाहावरून २५ हजार केव्ही एसी विद्युतप्रवाहावर चालवण्यासाठी महत्त्वाच्या या परिवर्तन प्रक्रियेतील मुख्य कामे अद्यापही शिल्लक असल्याने आता हे परिवर्तन १ जानेवारी २०१५ रोजी पूर्ण होणार असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सहा महिन्यांनी हार्बर मार्गावरील परिवर्तन प्रक्रिया पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. परिणामी पुढील चार महिने तरी मध्य रेल्वेवर नव्या बंबार्डिअर कंपनीच्या गाडय़ा धावणार नसून जुनाट गाडय़ांमध्ये प्रवाशांची घुसमट कायम राहणार आहे.
मध्य रेल्वेने डीसी-एसी परिवर्तनासाठी आतापर्यंत मे आणि ऑगस्ट २०१४ अशी मुदत जाहीर केली होती. आता ऑगस्ट उलटत असताना मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना याबाबत प्रश्न विचारता, हे परिवर्तन पूर्ण होण्यासाठी डिसेंबर अखेर उजाडणार आहे. १ जानेवारी २०१५ रोजी ठाणे ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यानचे डीसी-एसी परिवर्तन पूर्ण होऊन पहिली सर्वस्वी एसी विद्युतप्रवाहावरील गाडी या दिवशी धावेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्य मार्गावरील विद्युतप्रवाह परिवर्तनानंतर सहाच महिन्यांत हार्बर मार्गावरील परिवर्तनाचे काम पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader