लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त दर मोजून देखील प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करण्यास मध्य रेल्वे प्रशासन भाग पाडत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करून सामान्य लोकल चालवण्यात आल्या.
मध्य रेल्वेवरील अनेक सामान्य लोकल फेऱ्या रद्द करून, वातानुकूलित लोकल सुरू केल्या. बहुसंख्य प्रवाशांनी खिसा खाली करून, सामान्य लोकलच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचे वाढीव रकमेचे पास, तिकीट खरेदी करण्यास सुरुवात केली. परंतु, तांत्रिक बिघाडाने वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या मोजक्याच असल्याने प्रवाशांनी त्यांच्या कामाच्या वेळा सांभाळून वातानुकूलित लोकलच्या वेळेत प्रवास करतात.
आणखी वाचा-मराठा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ
मात्र, एक वातानुकूलित लोकलची फेरी रद्द केल्यानंतर बराच वेळानंतर दुसरी गाडी येतो. त्यावेळेत प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांचे तिकीटाचे पैसे वाया जातात. तसेच दुसऱ्या वातानुकूलित लोकल फेरीची वाट पाहत राहिल्यास प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड वारंवार होत असल्याने प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात लवकरच आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ७ लोकल फेऱ्या रद्द झाल्या. रद्द झालेल्या लोकलच्या वेळेत सामान्य लोकल चालवण्यात आल्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी, दुपारी ४ वाजताची सीएसएमटी-डोंबिवली, सायंकाळी ५.३२ वाजताची डोंबिवली-परळ, सायंकाळी ६.४५ वाजताची परळ-कल्याण, रात्री ८.१० वाजताची कल्याण-परळ, रात्री ९.३९ वाजताची परळ-कल्याण, रात्री ११.०४ वाजताची कल्याण-ठाणे या वातानुकूलित रद्द केल्या.