मुंबई : विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेने मोहीम हाती घेतली असून एका दिवसात शेकडो विनातिकीट प्रवाशांना पकडून, हजारो रुपयांची दंडवसुली करून तिकीट तपासनीस नवनवीन विक्रम करीत आहेत. एका तिकीट तपासनीसाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी करून फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेचे तिकीट तपासणी पथक सक्रिय झाले असून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत महसुलाची भर पडत आहे. तसेच विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांची होणारी गैरसोय टळत आहे. मध्य रेल्वेने २०२४-२५ मध्ये एकूण ३८ लाख प्रकरणातून २०३.४१ कोटी रुपये महसूल मिळवला.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि आरक्षित डब्यांमधील अतिरिक्त टाळण्यासाठी जून २०२४ पासून एक धोरणात्मक बदल करण्यात आला आहे. लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळापर्यंत दंड आकारण्याऐवजी पुढील स्थानकापर्यंत दंड आकारला जात आहे. त्यानंतर पुढील स्थानकात त्यांना उतरवण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास मिळत आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सण-उत्सवाच्या काळात विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.

मध्य रेल्वेच्या तीन तिकीट तपासणीसांनी उत्तम कामगिरी केली. मुख्यालयातील मुख्य तिकीट निरीक्षक एम. एम. शिंदे यांनी १५,९९३ विनातिकीट प्रवाशांची प्रकरणे शोधून काढली. याद्वारे त्यांनी १ कोटी १३ लाख ६८ हजार ३८० रुपय दंड वसूल करून सर्वोत्तम कामगिरी केली. त्याखालोखाल मुख्यालयातील प्रवासी तिकीट निरीक्षक मंगेश पाठक यांनी १२,२८९ विनातिकीट प्रकरणांतून ८४ लाख ५३ हजार ६१० रुपये दंड वसूल केला. मुख्यालयातील प्रवासी तिकीट निरीक्षक सुभाष गलांडे यांनी १२,८२० विनातिकीट प्रकरणातून ८४ लाख १० हजार ८६० रुपये दंड वसूल केला.

– मध्य रेल्वेचा मुंबई विभाग प्रवाशांची सुरक्षा आणि चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

– मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना बंदी घालण्यासाठी मध्य रेल्वेने ‘एसी टास्क फोर्स’ सुरू केला.

– प्रवाशांना तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध केला.

– प्रवाशांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

– हे पथक दिवसाचे २४ तास काम करते.

– व्हाॅट्स ॲप क्रमांकाद्वारे तिकीटधारक प्रवासी विनातिकीट प्रवाशांची तक्रार करीत आहेत.

– तसेच विशेष पथकाद्वारे गर्दीच्या वेळी तात्काळ मदत पुरवून, आवश्यकतेनुसार पाठपुरावा करत आहेत.

– व्हॉट्सअॅप क्रमांकावर प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीला त्वरीत प्रतिसाद दिला जातो.