माटुंगा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनजवळील मुळापासून कुजलेले एक झाड शुक्रवारी दुपारी ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे माटुंगा स्थानकात टिटवाळ्याहून छत्रपती शिवाजी टर्मिसच्या दिशेने जाणारी लोकल (अप धिम्या मार्गावर) अडकून पडल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या (धीम्या) येणाऱ्या जलदगती मार्गावरील वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला. परिणामी रेल्वेमार्गावर लोकलच्या रांगाच रांगा लागल्या. बराच वेळ लोकल जागच्या हालत नसल्याने लोकलमध्येच अडकून पडलेल्या अनेक प्रवाशांनी भर उन्हात रेल्वेमार्गातून पायपीट करणे पसंत केले.  
या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. झाड लोकलवर कोसळले नाही. परंतु या घटनेमुळे लोकल स्थानकातच अडकून पडली. अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर झाड हटविण्याचे काम हाती घेतले. झाड हटविले पण त्यामुळे ओव्हररेड वायरमध्ये निर्माण झालेला तांत्रिक अडथळा दूर करण्याच्या आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र तोपर्यंत ‘मरे’च्या वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. सुमारे दीड तास वाहतूक कोलमडल्याने रेल्वेमार्गात लोकलच्या अक्षरश: रांगा लागल्या. ओव्हरहेड वायरमधील अडथळा दूर झाल्यानंतर अखेर ३ वाजून ५५ मिनिटांनी वाहतूक सुरू झाली. पण त्यानंतरही मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर येण्यास बराच वेळ लागला. गाडय़ा दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्याच्या उद्घोषणा वारंवार करण्यात येत होत्या. शिवाय हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी प्रवाशांना देण्यात आली. रेल्वेमार्गात गाडय़ा एका मागोमाग एक खोळंबून राहिल्याने काही काळ कुर्ला आणि दादर स्थानकातही मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. दुपारी अडीच ते चार या कालावधीत वाहतूक पूर्णपणे कोलमडल्याने याचा फटका लांब पल्ल्याच्या गाडय़ांनाही बसला. पुण्याला जाणारी सिंहगड एक्स्प्रेस यामुळे अडकून पडली. शिवाय काही गाडय़ाही या दरम्यान रद्द करण्यात आल्या.
रेल्वे म्हणते..
दरम्यान, ओव्हरहेड वायरवर झाडाच्या फांद्या पडल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. त्यामुळे १२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर १२ गाडय़ा अन्यत्र वळविण्यात आल्या. नेहमीच्या वेळेपेक्षा गाडय़ा १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होत्या,  असे रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader